* जाणून घ्या बँकेचे नियम आणि तुमचे अधिकार!
* 'Loan Insurance’ घ्यायलाही विसरू नका !
* अन्यथा कुटुंबावर येऊ शकतो मोठा आर्थिक बोजा!
मुंबई / आर्थिक प्रतिनिधी :- घर, वाहन किंवा वैयक्तिक गरजांसाठी कर्ज घेणे आजच्या काळात सर्वसामान्य गोष्ट बनली आहे. परंतु, अनेकांना हा प्रश्न पडतो. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास ते कर्ज कोण फेडणार ? हा प्रश्न केवळ भावनिक नाही, तर आर्थिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे. चला तर जाणून घेऊ या, अशा प्रसंगी बँक कोणती पावले उचलते आणि कायदेशीरदृष्ट्या जबाबदारी कोणावर येते.
* कर्जदाराचा मृत्यू झाल्यानंतर बँकेची पहिली पायरी :- कर्जदाराच्या मृत्यूनंतर बँक सर्वप्रथम सहअर्जदाराशी (Co-borrower) संपर्क साधते. गृहकर्ज किंवा शैक्षणिक कर्जात सहअर्जदाराचे नाव असणे बंधनकारक असते. अशा वेळी सहअर्जदारावर उर्वरित हप्ते फेडण्याची संपूर्ण जबाबदारी येते. जर सहअर्जदार कर्जफेडीस असमर्थ ठरला, तर बँक पुढे हमीदाराशी (Guarantor) संपर्क करते. हमीदारानेही नकार दिल्यास, मयत कर्जदाराच्या कायदेशीर वारसांशी (Legal Heirs) संपर्क साधला जातो.
* वारसांची जबाबदारी काय असते ? :- बँकेच्या नियमानुसार, वारसांमध्ये पत्नी, मुले किंवा पालकांचा समावेश होतो. बँक या वारसांना अधिकृत नोटीस आणि स्मरणपत्रे पाठवते. जर त्यांनी प्रतिसाद दिला नाही, तर बँक कायदेशीर कारवाई करते. तथापि, हे लक्षात ठेवा जर वारसांनी मयताच्या संपत्तीवर हक्क सांगितला नसेल, तर बँक त्यांच्यावर कर्जफेडीचा दबाव आणू शकत नाही. पण, जर वारसांनी त्या संपत्तीचा वापर केला किंवा मालकी स्विकारली, तर त्यांना कर्जाची जबाबदारी घ्यावी लागते.
* बँक वसुलीसाठी काय करते ? :- गृहकर्जाच्या बाबतीत बँक त्या घरावर लिलाव प्रक्रिया सुरू करते. वाहनकर्जाच्या प्रकरणात वाहन जप्त करून विक्री केली जाते. वैयक्तिक कर्ज असल्यास बँक मयताची इतर मालमत्ता विकून वसुली करते.
* Loan Insurance - आर्थिक सुरक्षिततेचा आधार :- कर्ज घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे Loan Insurance. जर कर्जावर विमा घेतलेला असेल, तर मृत्यूनंतर विमा कंपनी संपूर्ण उर्वरित कर्ज बँकेला फेडते. त्यामुळे कुटुंबावर कोणताही आर्थिक ताण येत नाही. आज अनेक बँका गृहकर्ज, वाहनकर्ज आणि वैयक्तिक कर्जांसोबत हा विमा ऐच्छिक स्वरूपात देतात.
* काय लक्षात ठेवावे ? :-
- सहअर्जदार असल्यास, मृत्यूनंतर त्याच्यावर संपूर्ण जबाबदारी येते.
- हमीदार असल्यास, त्यालाही बँक परतफेडीस भाग पाडू शकते.
- वारसांनी मालमत्तेचा हक्क घेतल्यासच ते जबाबदार ठरतात.
- Loan Insurance असल्यास कर्ज विमा कंपनी फेडते.
- बँक कोणालाही जबरदस्ती करू शकत नाही, जोपर्यंत त्यांचा कायदेशीर हक्क सिद्ध होत नाही.
* कर्ज घेताना विमा घेणे म्हणजे कुटुंबासाठी सुरक्षा कवच :- आर्थिक सल्लागार सांगतात की, कर्ज घेतेवेळी लोक व्याजदर आणि EMI वर लक्ष देतात, पण विमा घेणे विसरतात. Loan Insurance घेतल्यास अचानक मृत्यूनंतर कुटुंब कर्जबोजातून वाचते.


Social Plugin