* 'गूढ शक्ती’ने मुलींचा आजार बरा करणार म्हणून इंग्लंडमधील घरापासून पुण्यातील संपत्तीवर डल्ला..विश्वास ठेवणाऱ्या उच्चशिक्षित दाम्पत्याचे आयुष्य उद्ध्वस्त
पुणे / प्रतिनिधी :- श्रद्धा आणि अंधश्रद्धेतील फरक ओळखण्यात झालेल्या चुकांमुळे पुण्यातील उच्चशिक्षित दाम्पत्याचे आयुष्य आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील कोथरूड परिसरात राहणारे आयटी इंजिनियर दीपक डोळस आणि त्यांची पत्नी अंजली डोळस हे ‘गूढ शक्ती’ने मुलींचे आजार बरे करणार असल्याच्या भुलथापेत अडकल्याने त्यांनी आतापर्यंत एकूण 14 कोटी रुपये गमावले आहेत.
वेदिका पंढरपूरकर नावाच्या एका कथित मांत्रिक महिलेने ‘आपल्या अंगात शंकर महाराज अवतरतात’ असा दावा करून डोळस दांपत्याला विश्वासात घेतले. त्यांच्या दोन मुलींचे जन्मजात आजार बरे करण्यासाठी जोडीचे सर्व पैसे आणि मालमत्ता तिच्या खात्यात जमा करा, असा अंधविश्वास निर्माण करून क्रमाक्रमाने त्यांच्या सर्व संपत्तीवर डल्ला मारण्यात आला.
* संपत्तीवर डल्ला कसा मारला ? :- बँक खात्यातील सर्व बचत, एलआयसी व गुंतवणूक योजनांतील रक्कम, म्युच्युअल फंड व पीएफ रक्कम, पुण्यातील दोन फ्लॅट विकून मिळालेले पैसे, इंग्लंडमधील घर व फार्महाऊस विकून मिळालेली रक्कम, शेवटच्या राहत्या घरावर कर्ज घेऊन दिलेले पैसे हे सर्व कोट्यवधी रुपये आरटीजीएसद्वारे वेदिका पंढरपूरकरच्या खात्यात वळवले गेले आहेत. या रकमेने पंढरपूरकर दांपत्याने कोथरूडमधील महात्मा सोसायटीत आलिशान बंगला खरेदी केला, तर डोळस कुटुंब आज भाड्याच्या घरात राहत आहेत. मुलींच्या उपचारासाठीही त्यांच्याकडे पैसे उरले नाहीत.
* घटना कशी उलगडली ? :- डोळस दांपत्याची ओळख एका भजनी मंडळाच्या माध्यमातून झाली. त्या मंडळातील राजेंद्र खडके नावाच्या तथाकथित गूढ साधकाने वेदिकाकडे नेले. 'शंकर महाराजांचा आशीर्वाद’ मिळवण्यासाठी सर्व संपत्ती अर्पण करावी लागेल, असे सांगून वेदिकाने त्यांना पूर्णपणे जाळ्यात ओढले.
* दांपत्याचा आक्रोश :- मुलींवरील प्रेमापोटी विश्वास ठेवला. ज्यांना माऊली मानले त्यांनीच सर्वस्व हिरावून घेतले, असा आक्रोश डोळस दांपत्याने केला आहे. या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली आहे. फसवणुकीचे सर्व दस्तऐवजी पुरावे डोळस कुटुंबाकडे आहेत.
* शिक्षण असूनही अंधश्रद्धेमुळे उद्ध्वस्त जीवन :- इंग्लंडमध्ये 12 वर्षे उच्च पदावर काम, परदेशातील अनुभव, उच्चशिक्षण...तरीही मुलींवरील प्रेम आणि चुकीच्या व्यक्तींवर ठेवलेला विश्वास यातून संपूर्ण आयुष्याची कमाई एका झटक्यात संपली. हा प्रकार अंधश्रद्धा किती घातक ठरू शकते आणि “शिक्षण म्हणजे वैज्ञानिक विचारसरणी नाही” याची जिवंत उदाहरण ठरला आहे.
वेदिका पंढरपूरकरच्या फसवणुकीला बळी पडलेल्या इतर लोकांसह हे प्रकरण अधिक गंभीर असून पोलिसांनी सखोल चौकशी करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.


Post a Comment
0 Comments