* आ. किशोर आप्पा पाटील यांचा निर्धार
* भाजपची गद्दारी स्मरणात ; यापुढे सर्व निवडणुका स्वबळावरच
* शेती, अतिवृष्टी नुकसान, पीकविम्यावर संताप ; बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा
पाचोरा / प्रतिनिधी :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाचोरा व भडगाव तालुक्यात शिंदेसेना गट स्वबळावरच उतरणार असून सत्ता शिंदेसेनेचीच आणणार, असा ठाम निर्धार आमदार किशोर पाटील यांनी शनिवारी व्यक्त केला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित निर्धार मेळाव्यात त्यांनी भाजपवर तीव्र हल्लाबोल करीत ‘गेल्या एक वर्षात सरकारकडून एक रुपयाचाही निधी मिळाला नाही’ असा आरोप केला. अतिवृष्टीमुळे प्रलंबित विकासकामांचे नुकसान झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
भाजपने सातत्याने गद्दारी केली असून आता मतदारसंघातील सर्व विरोधक एकत्र आल्याने शिंदेसेना स्वबळावरच लढणार, असा सज्जड इशारा आ. पाटील यांनी दिला. ‘आपण ठरवले तर जिल्हा परिषदेसह सर्व सत्तापदांवर शिंदेसेना झेंडा फडकवेल, असा आत्मविश्वास त्यांनी जाहीर सभेतून व्यक्त केला.
* शिंदेसेनेच्या कामांचा प्रसार करा :- शिवसेना शिंदेसेनेच्या लोकाभिमुख योजनांचा तळागाळात प्रसार करा, असे आवाहन करीत त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक तयारीच्या सूचना दिल्या. शिंदेसेनेतच जनतेचा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी किशोर पाटील यांची कन्या डॉं. प्रियंका पाटील यांचेही भाषण झाले. मेळाव्याला आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, विष्णू भंगाळे, बाजार समिती सभापती गणेश पाटील, संजय गोहिल, सुनीता पाटील, शरद पाटे, मनोज पाटील, किशोर बारवकर, राजेंद्र पाटील, नंदू पाटील, सुमित पाटील, विनोद तावडे, राहुल पाटील, विकास पाटील, विनोद तराळ आदी उपस्थित होते.
* बच्चू कडू यांच्या आंदोलनाला ठाम पाठिंबा :- शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी सरकारने पीकविमा रद्द केल्याचा निषेध नोंदविला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी लोकाभिमुख निर्णय झाले. शेतकऱ्यांना तातडीची कर्जमाफी हवी, असा आग्रह त्यांनी धरला. बच्चू कडू यांच्या आंदोलनालाही त्यांनी समर्थन जाहीर केले.
* गद्दारी सहन करणार नाही :- यापुढे शिंदेसैनिकांनी पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध काम केल्यास गय केली जाणार नाही, अशी स्पष्ट शब्दांत भूमिका पाटील यांनी मांडली. पाचोरा नगराध्यक्षपदासाठी सुनीता पाटील यांचा उमेदवार म्हणून उल्लेख करीत त्यांनी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट मिळवला.
* नवे चेहरे शिंदेसेनेत :- उद्धवसेना व भाजपमधील अनेक कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात शिंदेसेनेत प्रवेश केला. आमदार पाटील यांनी त्यांचे स्वागत करून पक्षबांधणीची दिशा स्पष्ट केली. मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्रवीण ब्राह्मणे व वैशाली पाटील यांनी केले.


Social Plugin