Type Here to Get Search Results !

ईर्षेतून अडीच वर्षांच्या मुलाचा गळा घोटला!

* नेरळ पोलिसांच्या तपासाने समोर आली काळीज गोठवणारी सत्यकथा

* कुरकुलवाडीत आईसमान महिलेने घेतला चिमुकल्याचा जीव 

कर्जत / नरेश जाधव :- कर्जत तालुक्यातील मौजे कुरकुलवाडी वारे येथे अडीच वर्षांच्या निरागस चिमुकल्याचा गळा घोटून खून केल्याच्या भीषण घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. “माझ्या मुलाला मारले म्हणून मी मारले”, अशी धक्कादायक कबुली आरोपी जयवंता गुरुनाथ मुकणे (वय 30, अंदाजे) हिने नेरळ पोलिसांसमोर दिली आहे. जयदीप गणेश वाघ (वय 2.5 वर्षे) या लहान मुलाचा गळा आवळून खून झाल्याची पुष्टी तपासात झाली आहे.

* मजुरीला गेलेल्या पालकांची शोकांतिका :- 9 नोव्हेंबर 2025 रोजी फिर्यादी गणेश वाघ आणि त्यांची पत्नी पुष्पा हे दोघे मजुरीसाठी बाहेर गेले होते. त्यांची मुले घरातच खेळत असताना, शेजारी राहणाऱ्या आरोपी महिलेने ईर्षा आणि रागातून जयदीपला उचलून नेले. घराजवळील पायवाटेत त्याचा गळा घोटून त्याला ठार मारले. त्यानंतर मुलगा बेशुद्ध पडल्याचे नाटक करीत त्याचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा आभास निर्माण करण्याचा आरोपीने प्रयत्न केला.


मुलगा निःश्वास सोडल्याचे लक्षात येताच आईने त्याला कळंब येथील रुग्णालयात नेले; परंतु तेथे डॉंक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कुटुंबाने मुलाचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे मानून त्याच दिवशी कुटुंबीयांनी आपली सोय रीत म्हणून त्याला गावातील स्मशानात पुरले.


* स्थानिक नागरिकाच्या धाडसाने तपासाला सुरुवात :- घटनेतील संशयास्पद बाबी एका स्थानिक नागरिकाने नेरळ पोलिसांना कळविल्यानंतर प्रकरणाचा खरा धागा सुटू लागला. नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी माहितीला गांभीर्याने घेत तातडीने घटनास्थळी धाव घेतली.


ढवळे यांनी मृत्यूतील विसंगती ओळखून वरिष्ठांना माहिती दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल गायकवाड आणि रायगड पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच कर्जतचे तहसीलदार धनंजय जाधव यांच्या परवानगीने मृतदेह स्मशानभूमीतून बाहेर काढण्यात आला आणि शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला आणि शवविच्छेदन अहवालात मुलाचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले.


* काटेकोर तपासात आरोपीची कबुली - इर्षेतून घेतला जीव :- शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने पुराव्यांची सांगड घालत जयवंता मुकणे हिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सलग चौकशीत अखेर तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिच्या मुलांना फिर्यादीच्या मुलांकडून त्रास होत असल्याचा तिचा आरोप असून, याच चिडीतून तिने हे भयावह पाऊल उचलल्याचे कबूल केले आहे. नेरळ पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 202/2025 अन्वये भा.न्या. संहिता 2023 चे कलम 103(1) आणि 109 नुसार गुन्हा दाखल केला असून आरोपी महिला 17 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कस्टडीत आहे.


* पोलिसांच्या सूक्ष्म तपासाचे सर्वत्र कौतुक :- गावात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी वेगाने, अचूक आणि संवेदनशीलतेने हाताळलेल्या तपासामुळे सत्य बाहेर आल्याने नेरळ पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


* खुनाच्या एक दिवस आधीही मुलीला ठार मारण्याचा प्रयत्न उघड :- तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गुन्ह्याच्या एक दिवस आधी (8 नोव्हेंबर) आरोपी महिलेने फिर्यादीच्या चार वर्षांच्या मुलीला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो प्रयत्न फसला. दुसऱ्याच दिवशी तिने अडीच वर्षांच्या मुलाचा जीव घेतला.


आरोपी महिलेला तीन मुले असून त्यातील दोन दीड वर्षांची जुळे मुले आहेत. तिचा मोठा मुलगा मात्र नातेवाईकांकडे दत्तक देण्यात आलेला असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.



Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement