Type Here to Get Search Results !

कर्जतमध्ये भाजपला मोठा धक्का!

* माजी नगरसेवक बळवंत घुमरे व माजी नगरसेविका बिनीता घुमरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

* 35 वर्षांच्या निष्ठेनंतर घुमरे दाम्पत्याचा भाजपशी दुरावा

* नाराज कार्यकर्त्यांच्या लोंढ्याने स्थानिक राजकारणात खळबळ

कर्जत / राजेंद्र जाधव :- कर्जत शहरात भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला असून भाजपचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते, माजी नगरसेवक बळवंत घुमरे आणि माजी नगरसेविका बिनीता घुमरे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे कर्जतच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.


शनिवार, 15 नोव्हेंबर 2025 रोजी कर्जत येथील राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. घुमरे दाम्पत्याने घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे जाहीर केले. परिणामी तोंडावर आलेल्या नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक वाढली असून घारे यांचे हात आणखी मजबूत झाले आहेत.


* 35 वर्षांची निष्ठा संपली :- बळवंत आणि बिनीता घुमरे हे गेली दोन ते अडीच दशके कर्जत शहरात आणि तालुक्यात सामाजिक कामाच्या माध्यमातून सक्रिय होते. घुमरे मित्र मंडळ, आरोग्य शिबिरे, आभा कार्ड उपक्रम, मोतीबिंदू मुक्त कर्जत तालुका अशी अनेक उपक्रम राबवून त्यांनी भाजपची पकड मजबूत केली होती. तथापि, गेल्या काही काळापासून भाजपमधील अंतर्गत गटबाजी, वरिष्ठ नेत्यांचे पक्षवाढीऐवजी स्वतःचे अस्तित्व टिकविण्यावरचे राजकारण यामुळे ते नाराज होते.


पक्ष प्रवेश सोहळ्यात भावनिक होत माजी नगरसेविका बिनीता घुमरे म्हणाल्या की, आम्ही 35 वर्षे भाजपची सेवा केली. पण आज पक्षात गटबाजी वाढली आहे. पक्ष वाढावा यापेक्षा काही पदाधिकारी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यावर भर देत आहेत. महिला नगराध्यक्ष पदाच्या इच्छुक म्हणून आम्हाला योग्य न्याय मिळणे गरजेचे होते, पण जिल्हा नेतृत्वाने याकडे दुर्लक्ष केले. म्हणूनच आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.


* आणखी कार्यकर्ते राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता :- सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपमधील नाराजी केवळ घुमरे दाम्पत्यापुरती मर्यादित नसून काही सक्रिय कार्यकर्तेही बेचैन आहेत. लवकरच आणखी काही नाराज कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. पक्ष प्रवेशावेळी स्मिता दिनेश सविते, बिना सविते, धनंजय जोशी, करण घुमरे तसेच इतर कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजून अनेक कार्यकर्ते आमच्या संपर्कात असून तेही लवकरच राष्ट्रवादीत येतील, असे बळवंत घुमरे यांनी सांगितले.


* नगर परिषद निवडणुकीत समीकरणे बदलणार :- या घडामोडींमुळे कर्जतमधील नगर परिषद निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वाढली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांना मोठे बळ मिळाले आहे, तर भाजपच्या स्थानिक नेतृत्वापुढे नवे आव्हान उभे राहिले आहे. या कार्यक्रमाला उध्दव सेनेचे नेते नितीन सावंत, बाजीराव दळवी, बाबू घारे यांसह परिवर्तन विकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement