Type Here to Get Search Results !

यश विद्या निकेतन ग्लोबल स्कूलमध्ये संविधान दिन भव्यदिव्य साजरा

* 'आपले संविधान’ पुस्तकाचे पद्मश्री रमेश पतंगे यांच्या हस्ते प्रकाशन ;  229 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

वसई / प्रतिनिधी :- विरार पश्चिम येथील यश विद्या निकेतन ग्लोबल स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. “आपले संविधान” या घोषवाक्याखाली आयोजित या उपक्रमातील मुख्य आकर्षण म्हणजे पद्मश्री रमेश पतंगे लिखित ‘आपले संविधान’ या पुस्तकाचे प्रकाशन होय. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक मूल्यांची जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आला.

संविधान दिनानिमित्त शाळेत वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन, न्यूज अँकरिंग, पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये एकूण 23 संस्थांमधील 229 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, ज्यातून विद्यार्थ्यांच्या संविधानविषयक जाणिवा, विचार आणि सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळाले.


सायंकाळी आयोजित मुख्य कार्यक्रमात माजी महापौर राजीव पाटील यांनी प्रास्ताविक केले. या समारंभास पद्मश्री रमेश पतंगे, डॉं. संजय देशमुख (माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ), दिनेश कांबळे (माजी रजिस्ट्रार, मुंबई विद्यापीठ), शाळेचे संस्थापक संजीव पाटील, साधना पाटील, ग्रीष्मा पाटील-पोटे, मुख्याध्यापिका कुलकर्णी, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक आदी उपस्थित होते.


पुस्तक प्रकाशनानंतर बोलताना पद्मश्री रमेश पतंगे म्हणाले की, संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या चार मूलभूत तत्त्वांचे महत्त्व प्रत्येक विद्यार्थी आणि नागरिकाने समजून घेणे गरजेचे आहे.


डॉं. संजय देशमुख यांनी विद्यार्थ्यांना संविधान मूल्ये जपण्याचे आणि नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडण्याचे आवाहन केले.


विविध स्पर्धांतील विजेत्यांना स्मृतिचिन्हे व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनी दाखविलेल्या सर्जनशीलतेचे मान्यवरांनी कौतुक केले.


वक्तृत्व, सर्जनशीलता आणि नागरिकत्व मूल्यांमध्ये विद्यार्थ्यांची जाण वाढावी या उद्देशाने अशा कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी करण्यात येईल, असे आश्वासन माजी महापौर राजीव पाटील यांनी दिले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थापक संजीव पाटील यांनी सर्व मान्यवर, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement