* फक्त काही तासांत आरोपी जेरबंद, ४१,५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
पाचोरा / फिरोज पिंजारी :- जळगाव जिल्ह्यात अलीकडच्या काळात वाढत्या चोरी आणि घरफोडीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना गुन्ह्यांचा जलद तपास करून आरोपींना तात्काळ गजाआड करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या निर्देशानुसार पाचोरा पोलिसांनी अवघ्या काही तासांत घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीला अटक केली असून चोरीचा ४१,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे.
फिर्यादी सोपान भिकन कुमावत (वय ५१, रा. भातखंडे खुर्द, ता. पाचोरा) हे १० नोव्हेंबर २०२५ रोजी आपल्या नातलगांच्या लग्नानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांच्या गैरहजेरीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून कपाटातील रोख रक्कम ₹४१,५०० चोरून नेली. या घटनेनंतर कुमावत यांनी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. ५३०/२०२५ भादंवि कलम ३३१(१) नुसार तक्रार दाखल केली. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी तातडीने तपास पथक नेमले.
तपास पथकाने घटनास्थळी पाहणी केली तसेच आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण केले. याच दरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, भातखंडे खुर्द येथील रहिवासी कन्हैय्या विनोद कुमावत (वय २५) या तरुणावर संशय आहे. संशयिताला अटक करून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेली संपूर्ण ₹४१,५०० ची रक्कम जप्त केली.
या यशस्वी कारवाईमागे जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांचे प्रभावी मार्गदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर यांचा समन्वय आणि उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांचे सक्रिय पर्यवेक्षण लाभले. कारवाई पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली सपोनि संजय निकुंभ, पोना महेंद्र पाटील, तुषार विसपुते, संदीप राजपुत, जितेश पाटील, हरीश परदेशी, श्रीराम शिंगी, संतोष राजपुत आणि अनिल पवार यांनी संयुक्तपणे पार पाडली.
या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे जनतेत पोलिसांबद्दलचा विश्वास आणखी बळकट झाला असून, परिसरातील नागरिकांनी पाचोरा पोलिसांचे मनापासून कौतुक केले आहे. पोलिस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले की, संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवा आणि सावधगिरी बाळगा. तुमच्या माहितीमुळे गुन्हे रोखण्यास मोठी मदत होईल.
ही कारवाई पाचोरा व जिल्हा पोलिसांच्या सतर्कतेचे आणि गुन्हे उघड करण्याच्या कटिबद्धतेचे उत्तम उदाहरण ठरली आहे. ग्रामीण भागात वारंवार घडणाऱ्या घरफोडीच्या घटनांवर पाचोरा पोलिसांची ही जलद कारवाई आदर्शवत ठरली आहे.


Post a Comment
0 Comments