Type Here to Get Search Results !

शरद पवारांनी दिलेल्या महिला आरक्षणाचा लाभ घ्या - रोहिणी खडसे

* स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी (श. प.) महिला आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक

पुणे / प्रतिनिधी :- राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, लवकरच महानगरपालिका निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (श. प.) पिंपरी-चिंचवड शहरात निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. याच अनुषंगाने पक्षाच्या महिला आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली.

* महिला आरक्षण म्हणजे संधी - रोहिणी खडसे :- बैठकीत बोलताना पक्षाच्या प्रदेश महिला अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सांगितले की, शरद पवार साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण मिळवून दिले आहे. हा निर्णय महिलांसाठी ऐतिहासिक असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी या आरक्षणाचा सकारात्मक लाभ घेत संधीचे सोने केले पाहिजे. राजकारणात सुरुवातीला अडचणी येतात, मात्र त्यावर मात करीत सातत्याने काम करणे हाच यशाचा मंत्र आहे. महिलांनी घराचा उंबरठा ओलांडून समाजकार्यासाठी पुढे यावे, असे आवाहन करीत त्यांनी महिलांच्या नेतृत्वावर भर दिला.


* निवडणुकीची तयारी आत्तापासूनच - सुनिल गव्हाणे :- यावेळी बोलताना विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे म्हणाले की, महिलांनी आपल्या विरोधात किंवा सोबत कोण उमेदवार आहे याचा विचार न करता निवडणुकीच्या तयारीला लागावे. राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतल्यास महिलांचे सामाजिक व राजकीय स्थान अधिक मजबूत होईल, असे सांगितले.


* उमेदवारी अर्ज लवकरच कोअर कमिटीसमोर - ज्योती निंबाळकर :- पिंपरी - चिंचवड शहर महिला अध्यक्षा ज्योती निंबाळकर यांनी माहिती देताना सांगितले की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील प्रत्येक प्रभागातून महिलांचे उमेदवारी अर्ज पक्षाकडे प्राप्त झाले आहेत. हे सर्व अर्ज लवकरच कोअर कमिटीसमोर सादर करण्यात येणार आहेत.


* महिला समस्यांवर सविस्तर चर्चा :- बैठकीदरम्यान उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी शहरातील अनियमित पाणीपुरवठा, महिला स्वच्छतागृहांची अपुरी व्यवस्था, महिला सुरक्षिततेचे प्रश्न, तसेच इतर महिलांसमोरील असंख्य समस्यांचा पाढा रोहिणी खडसे यांच्यासमोर मांडला. या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देत त्यावर प्रभावी उपाययोजना करण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.


या बैठकीस शहर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, प्रदेश संघटक सचिव संदीप चव्हाण, चिंचवड विधानसभा अध्यक्ष सोनल पासलकर, भोसरी विधानसभा अध्यक्ष सारिका हरगुडे, पिंपरी विधानसभा अध्यक्ष कल्पना घाडगे, माजी नगरसेविका प्रियांका बारसे, विद्यार्थी शहराध्यक्ष राहुल आहेर, सामाजिक न्याय शहराध्यक्ष मयूर जाधव, प्रवक्ते माधव पाटील, अरुण पवार, चिंचवड कार्याध्यक्ष सुवर्ण वाळके, पिंपरी कार्याध्यक्ष बबिता बनसोडे, प्रफुल्ला मोतीलिंग तसेच अन्य अनेक महिला व पुरुष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement