* पती-पत्नीने प्रियकराला संपवले
* मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
पाचोरा - धुळे / प्रतिनिधी :- अनैतिक संबंध आणि ब्लॅकमेलिंगच्या संशयातून एका 25 वर्षीय तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह दुसऱ्या जिल्ह्यात नेऊन जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणाने जळगाव आणि धुळे जिल्ह्याच्या सीमेवरील परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तांत्रिक तपास आणि कसून चौकशीतून आरोपी पती-पत्नीला अटक केली असून दोघांनी गुन्हा कबूल केला आहे. मात्र, खून कसा केला आणि मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली याबाबत आरोपी वेगवेगळ्या कहाण्या सांगत असल्याने पोलिसही संभ्रमात आहेत.
* घटनेची पार्श्वभूमी : प्रेमसंबंध ते ब्लॅकमेलिंग :- पाचोरा तालुक्यातील वरसाडे तांडा (ता. पाचोरा) येथील विजय भिमा राठोड (वय 25) हा तरुण 24 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 11.30 वाजता घरातून बाहेर पडला आणि नंतर बेपत्ता झाला. त्याच्या भाऊ संजय राठोड यांनी 26 फेब्रुवारी रोजी पिंपळगाव हरे (हरेश्वर) पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान पोलिसांना तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून संशयित संजय परशुराम जाधव (वय 35, बैल व्यापारी, रा. पिंपळगाव हरे तांडा) याच्याकडे संशय गेला. चौकशीत सुरुवातीला उडवाउडवी करणाऱ्या संजयने पोलिसांच्या दबावाखाली गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, त्याची पत्नी सोनाली संजय जाधव आणि विजय राठोड यांच्यात विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. या संबंधातून विजयने सोनालीचे अश्लील व्हिडिओ काढले आणि त्याचा वापर करून ब्लॅकमेलिंग केले. या रागातून संजय आणि सोनाली यांनी मिळून विजयचा खून केल्याचे दोघांनी कबूल केले.
* खून कसा केला ? आरोपींच्या परस्परविरोधी कबुल्या :- कधी गळा आवळून मारल्याचा दावा, कधी लोखंडी शस्त्राने वार केल्याचा आरोप, खून झाल्यानंतर मृतदेह जाळून जंगलात फेकल्याचे सांगणे...या विरोधाभासी विधानांमुळे पोलिसांना नेमका घटनाक्रम उलगडणे अवघड झाले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक कल्याणी वर्मा या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत.
* मृतदेह जळगावहून धुळेपर्यंत नेला :- प्राथमिक तपासात समोर आले की, खून जळगाव जिल्ह्यातील अंजनविहिरे (ता. शिंदखेडा) जवळील पाटाच्या चारी परिसरात पुलाजवळील पाईपमध्ये झाला. नंतर पुरावे नष्ट करण्यासाठी संजय जाधवने मृतदेह धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा परिसरात नेऊन जाळला. 21 फेब्रुवारी 2026 रोजी ही घटना घडली असावी, अशी माहिती आहे. घटनास्थळी जळालेल्या अवशेष, हाडे आणि इतर पुरावे सापडले असून फॉरेन्सिक पथकाने नमुने ताब्यात घेतले आहेत. डीएनए तपासणीद्वारे मृतदेहाची ओळख निश्चित करण्याची शक्यता आहे.
* पोलिसांची कारवाई : अटक आणि विशेष पथके :- पिंपळगाव हरे पोलिस ठाण्यात खून (IPC 302), पुरावा नष्ट करणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संजय परशुराम जाधव आणि सोनाली संजय जाधव या पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे. दोघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. ही घटना ग्रामीण भागातील प्रेम, विश्वासघात आणि बदल्याच्या भावनेतून उद्भवलेल्या गुन्ह्याचे उघड उदाहरण ठरली आहे.


Social Plugin