Type Here to Get Search Results !

व्यसनमुक्ती हीच प्रगतीची दिशा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

* राज्यस्तरीय ‘महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ वितरण सोहळा मुंबईत उत्साहात पार

मुंबई / प्रतिनिधी :- व्यसन ही समाजासमोरील गंभीर समस्या असून त्यातून कुटुंबे उद्ध्वस्त होतात आणि तरुण पिढीचे भविष्य धोक्यात येते. त्यामुळे “व्यसनमुक्ती हीच प्रगतीची दिशा आहे” असा ठाम संदेश देत नागरिकांनी व्यसनमुक्त जीवन स्विकारावे, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ वितरण सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. सन 2020 ते 2025 या कालावधीतील कार्यकर्ते व संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला.


* तरुणाईला व्यसनापासून दूर ठेवणे गरजेचे :- ना. आठवले म्हणाले की, देशाचे भविष्य तरुणांच्या हातात आहे. मात्र, हीच तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. ड्रग्जसारख्या घातक व्यसनांविरोधात सरकार कठोर पावले उचलत असून प्रत्येकाने व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.


या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष ॲंड. राहुल नार्वेकर, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, प्रधान सचिव डॉं. हर्षदीप कांबळे, आयुक्त दिपा मुधोळ-मुंडे, कीर्तनकार सत्यपाल महाराज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


* समाजाने एकत्र येण्याची गरज - राहुल नार्वेकर :- विधानसभा अध्यक्ष ॲंड. राहुल नार्वेकर यांनी सांगितले की, व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी शासनाबरोबरच प्रत्येक नागरिक, संस्था आणि समाजघटकांनी जबाबदारी स्विकारणे अत्यावश्यक आहे.


* कार्यकर्त्यांचे योगदान अमूल्य - संजय शिरसाट :- सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक करतांना सांगितले की, व्यसनामुळे केवळ व्यक्तीच नाही तर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. अशा परिस्थितीत कार्यकर्ते समाजात आशेचा किरण ठरतात. एखादे कुटुंब वाचविणे हेच सर्वात मोठे यश आहे, असे त्यांनी नमूद केले.


या सोहळ्यात 100 व्यक्ती आणि 13 संस्थांचा सन्मान करण्यात आला आहे. व्यक्तीगत पुरस्कार 15,000/- रुपये & सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह तर संस्थांसाठी  30,000/- रुपये, सन्मानचिन्ह या पुरस्कारांद्वारे व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्याची दखल घेण्यात आली.


* आठवले यांची कविता :- ना. रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत व्यसनमुक्तीवर कविता सादर करीत उपस्थितांची मने जिंकली.

“जर केली तुम्ही रोज नशा,

तर समाजात होईल तुमचा हशा...

मी करतो नशा...

पण ती आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची नशा!”

तसेच,

“होईल जर व्यसनमुक्ती;

तर वाढेल महाराष्ट्राची शक्ती!”

या ओळींना सभागृहातून उत्स्फूर्त दाद मिळाली.

.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement