Type Here to Get Search Results !

नगरदेवळा येथील पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाटील यांना ‘जीवन रक्षक’ पुरस्कार

* दिव्य मराठी वृत्तसमूहातर्फे सन्मान ; जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते गौरव

नगरदेवळा / हसीबूर शेख :- पाचोरा पोलीस स्टेशन अंतर्गत नगरदेवळा औट पोस्ट येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस कॉन्स्टेबल तथा सांगवी गावाचे सुपुत्र दिनेश महादू पाटील यांना दिव्य मराठी वृत्तसमूहातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘जीवन रक्षक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते हा गौरव सोहळा संपन्न झाला.

पोलीस सेवेत कार्यरत असतांना दिनेश पाटील यांनी विविध प्रसंगी दाखविलेली तत्परता, धाडस, सामाजिक बांधिलकी आणि संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी घेतलेला पुढाकार याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. कर्तव्याच्या पलीकडे जाऊन केलेल्या कार्यामुळे त्यांनी पोलीस दलात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.


पुरस्कार प्रदान करतांना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिनेश पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी सदैव तत्पर राहणारे अधिकारी व कर्मचारी हेच पोलीस दलाची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांमुळे पोलीस विभागाबद्दलचा समाजातील विश्वास अधिक दृढ होत असल्याचेही त्यांनी सांगितले.


दिनेश पाटील यांना मिळालेल्या या सन्मानामुळे नगरदेवळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या यशाचे मित्रपरिवार, सहकारी कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी तसेच ग्रामस्थांकडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दिनेश पाटील यांचा हा सन्मान प्रेरणादायी ठरत असून, समाजसेवा आणि जनहितासाठी समर्पित राहण्याचा संदेश या पुरस्कारातून मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.


नगरदेवळा गावाचे नाव जिल्हास्तरावर गौरवास्पद करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल दिनेश पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement