* भाजप नेते प्रणय (मुन्नाभाऊ) भांडारकर यांच्या पुढाकाराने युवा मल्लांचा सन्मान
* अंडर-19 गटातील यशानंतर चार युवा मल्लांची विभागस्तरासाठी निवड
* ग्रामीण भागातील आराध्या महाजनची कामगिरी ठरली विशेष कौतुकाची
नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा येथील सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील युवा मल्लांनी जिल्हास्तरीय अंडर-१९ कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत नगरदेवळ्याच्या कुस्ती परंपरेची छाप उमटवली आहे. विविध वजनगटांत चमकदार कामगिरी करणाऱ्या चार युवा मल्लांची विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, ग्रामीण भागातील आराध्या प्रवीण महाजन हिने तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत यश मिळवत विशेष लक्ष वेधून घेतले आहे.
दरम्यान, या युवा मल्लांच्या यशाचे कौतुक करण्यासाठी अनुप कृषी सेवा केंद्राचे संचालक तथा भाजप नेते प्रणय (मुन्नाभाऊ) दिलीप भांडारकर यांच्या पुढाकाराने विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रणय (मुन्नाभाऊ) भांडारकर यांच्या हस्ते युवा मल्लांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी वस्ताद अशोक नाना कोळी, वस्ताद अकबर दादा मणियार, पैलवान नाना भामरे, पैलवान गणेश शिंदे, पैलवान पिंटू राजपूत, अन्नू मेंबर, अर्जून महाजन, छोटू लोहार, अशोक सोन्नी, पैलवान सुनील महाजन, पैलवान निसार खान, माजी उपसरपंच विलास भामरे, सलीम शाह, कडू नाना पाटील, शेर खान, महेमूद पहेलवान, पप्पू पहेलवान (खाजोळा), दिनेश पहेलवान, गोलू पहेलवान, पैलवान आबा महाजन आणि दादू पहेलवान आदी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय स्पर्धेत विविध वजनगटांत विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी केली. त्यांच्या सातत्यपूर्ण सरावाला आणि मेहनतीला स्पर्धेतील यशाची जोड मिळाली असून, आता विभागस्तरावरही चांगली कामगिरी करण्यासाठी युवा मल्ल सज्ज झाले आहेत.
विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या मल्लांमध्ये चेतन सुनील पाटील (इयत्ता 11 वी आर्ट्स, 71 किलो वजन गट, वडगाव मुलाणे), कल्पेश किरण सोनवणे (इयत्ता 12 वी आर्ट्स, 70 किलो वजन गट), साहिल गणेश पवार (इयत्ता 10 वी, 48 किलो वजन गट), सुलतान खान निसार (इयत्ता 12 वी, 61 किलो वजन गट) तसेच आराध्या प्रवीण महाजन तालुकास्तरीय स्पर्धेत विजेती ठरली आहे.
आराध्या प्रवीण महाजन हिने तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत यश मिळविल्याने तिच्या कामगिरीचे विशेष कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील मुलींना क्रीडा क्षेत्रात संधी आणि प्रोत्साहन मिळणे महत्त्वाचे असून आराध्याने कुस्तीच्या आखाड्यात मिळवलेले यश इतर मुलींसाठीही प्रेरणादायी ठरू शकते, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
युवा मल्लांच्या कामगिरीचे कौतुक करतांना अनुप कृषी सेवा केंद्राचे संचालक तथा भाजप नेते प्रणय (मुन्नाभाऊ) दिलीप भांडारकर म्हणाले की, आता राज्यस्तरीय स्पर्धेत यश संपादन करण्यासाठी तयारी करा. आपल्या गावातील ज्येष्ठ मल्लांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेऊन पुढे जा. शहरी भागात मुलींना क्रीडा क्षेत्रात अनेक संधी मिळतात. मात्र ग्रामीण भागातील एका मुलीने तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत यश मिळवणे ही अभिमानाची बाब आहे. युवा मल्लांनी आपला सराव सातत्याने सुरू ठेवून पुढील स्पर्धांसाठी अधिक मेहनत घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
समाजसेवी छोटू लोहार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, संगतीचा मोठा परिणाम आपल्यावर होत असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपली संगत योग्य ठेवावी, असे त्यांनी आवाहन केले. क्रीडा क्षेत्रात यश मिळवण्यासाठी शिस्त, नियमित सराव, योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक संगत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या या युवा मल्लांकडून आता पुढील स्पर्धेतही दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे. ग्रामीण भागातील कुस्तीची परंपरा, ज्येष्ठ मल्लांचे मार्गदर्शन आणि युवा पिढीची मेहनत यामुळे नगरदेवळा परिसरातील कुस्तीला नवी दिशा मिळत असल्याचे चित्र या यशातून दिसून येत आहे.


Post a Comment
0 Comments