* डिव्हायडरमध्ये मजबूत लोखंडी जाळी बसविण्याची मागणी
* अपघातांचा धोका टाळण्यासाठी पोलीस हक्क संघर्ष संघटनेचे संबंधित विभागाला निवेदन
भुसावळ / फजल शेख :- भुसावळ शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवरील वाढत्या अपघातांचा धोका लक्षात घेता महामार्गांच्या डिव्हायडरमध्ये मजबूत लोखंडी जाळी बसवून अनधिकृत क्रॉसिंग तातडीने बंद करण्यात यावे, अशी मागणी पोलीस हक्क संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य, जिल्हा जळगाव यांच्या वतीने करण्यात आली आहे.
संघटनेच्या जिल्हाध्यक्ष वर्षाताई तल्लारे यांच्या नेतृत्वाखाली 1 ऑक्टोबर रोजी संबंधित अधिकारी साळुंखे साहेब यांना याबाबत निवेदन देण्यात आले.
वांजोळा रोड चौक, सिटी हॉस्पिटल, आर. के. पेट्रोल पंप आणि राधाकृष्ण हॉटेल परिसरात नागरिक तसेच वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
महामार्गांच्या डिव्हायडरमध्ये योग्य प्रकारे लोखंडी जाळी नसल्याने नागरिकांकडून शॉर्टकटने महामार्ग ओलांडण्याचे प्रकार होत आहेत. तसेच महामार्गांलगतच्या मोकळ्या जागेतून होणाऱ्या अनधिकृत क्रॉसिंगमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय हॉटेल गॅलेक्सी ते मशिदीकडे जाणाऱ्या मार्गासाठी सुमारे 100 मीटर रस्ता तयार करण्यात यावा, अशी स्वतंत्र मागणीही संघटनेने केली आहे.
नागरिकांच्या जीविताची सुरक्षितता लक्षात घेऊन संबंधित विभागाने महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून धोकादायक ठिकाणी लोखंडी जाळी बसवावी, अनधिकृत क्रॉसिंग बंद करावे आणि आवश्यक रस्ता सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी संघटनेने केली आहे.
निवेदनावेळी फैयाज हुसेन, शेख फिरोज रहमान, नदीम शेख, ओसामा खान, बाबू खान, फिरोज तडवी, अबुजर शेख, आशा कोठारी, सद्दाम खाटीक, सलीम भाई, अकबर गवळी, फरहान शेख, असगर शेख यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments