Type Here to Get Search Results !

कश्मीरमध्ये धर्म विचारून गोळ्या झाडल्या !

* जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू : दोन पर्यटक जखमी

मुंबई / प्रतिनिधी :- जम्मू- काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दिलीप डिसले आणि अतुल मोने असे या मृत पर्यटकांची नावे आहेत. तर दोन पर्यटक जखमी असून एकजण पनवेलचे असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या संपर्कात आहेत.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांना फोन करुन या हल्ल्याची माहिती घेतली. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दिलीप डिसले आणि अतुल मोने या दोघांचा मृत्यू झाला. तर इतर दोघे जखमी आहेत. जखमी माणिक पटेल या पनवेलच्या आहेत. तर एस. भालचंद्र राव हे राज्यातील कोणत्या भागातील आहेत याची माहिती घेतली जात आहे. जखमींची नावे काश्मीर प्रशासनाने कळविलेली आहेत. ही नावे माणिक पटेल पनवेल, एस. भालचंद्रराव अशी असून सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. 


याबाबत पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी म्हणाले की, पहलगाव दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या कुटुंबाची माहिती अद्याप निश्चित झालेली नाही. ते सतत सरकारच्या संपर्कात आहेत आणि लवकरच तपशील जाहीर केला जाईल. प्राथमिक माहितीनुसार, कुटुंबातील 5 सदस्यांपैकी 2 जण गंभीर स्थितीत आहेत. जी काही मदत लागेल ती मदत प्रशासन करीत आहे. अशा प्रकारच्या हल्ल्याचा आम्ही निषेध करीत असून त्यांचा नायनाट केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असे  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील पाच जणांचे कुटुंब पहेलगामला पर्यटनासाठी गेले होते. ज्यामधे दोन पुरुष आणि तीन महिला होत्या. अनंतनाग जिल्ह्यातील पहेलगाममधे एका व्हॅलीत पर्यटकांसह हे कुटुंब काश्मीरी पोषाख घालून फोटो काढत होते. त्यावेळी अचानक समोर दहशतवादी आले.‌ दहशतवाद्यांनी या पर्यटकांना नाव व धर्म विचारला, त्यानंतर पंतप्रधान मोदींबद्दल काही वक्तव्य करीत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला.


मिळालेल्या माहितीनुसार 10 दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या 10 दहशतवाद्यांमध्ये 6 दहशतवादी हे स्थानिक होते तर 4 दहशतवादी हे परदेशी असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरक्षा यंत्रणांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहेलगाममधील दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानच्या सुनियोजित कटाचा भाग आहे, असे सांगण्यात येत आहे. या कटात पाकिस्तानने लष्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मदसारख्या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांचा वापर केला आहे, जे आता छोटे हल्लेखोर गट तयार करीत आहेत आणि निष्पाप लोकांना मारत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आजचा हल्ला अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वी यात्रेकरू आणि पर्यटकांमध्ये भीती पसरवण्यासाठी करण्यात आला आहे, असे सांगण्यात येत आहे. सोनमर्गमध्येही असाच हल्ला झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आजच्या हल्ल्यानंतर, असे मानले जात आहे की, टीआरएफ (द रेझिस्टन्स फ्रंट) चे "फाल्कन स्क्वॉड" येत्या काळात काश्मीरमध्ये एक मोठे आव्हान बनण्याची शक्यता आहे.


या गटाचे लक्ष हत्या आणि नंतर जंगलात किंवा उंच ठिकाणी लपून बसणे आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार फाल्कन स्क्वॉडला अलीकडेच मोठ्या प्रमाणात प्रगत शस्त्रास्त्रे मिळाली आहेत, जी आता हल्ल्यांमध्ये वापरली जात आहेत. गुप्तचर अहवालांनुसार, फाल्कन स्क्वॉड सोशल मीडियाद्वारे आपले नवीन सदस्य जोडत आहे. हा गट 'हिट अँड रन' या धोरणावर काम करतो आणि ओजीडब्ल्यू (OGW-ओव्हर ग्राउंड वर्कर्स) च्या सहकार्याने ऑपरेशन्स करतो. टीआरएफ ही प्रत्यक्षात लष्कर ए तैयबाची एक आघाडी आहे आणि फाल्कन स्क्वॉड त्याचा एक भाग आहे. लष्कराचे वरिष्ठ नेते आता थेट अशा हल्ल्यांचे आदेश देत आहेत. या प्रकरणाचा तपास एनआयए घेणार आहे. दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतेच सोनमर्गला भेट दिली होती आणि ते बुधवारी पहलगामलाही पोहचतील. सूत्रांच्या माहितीनुसार हल्ला करणारे दहशतवादी काही दिवसांपूर्वीच पहेलगावमध्ये आले होते. आधी रेकी केली आणि नंतर संधी मिळताच हल्ला केला, असे सूत्रांनी सांगितले आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement