वसई / प्रतिनिधी :- भारतीय खेलो मास्टर्स गेम्स राष्ट्रीय चॅम्पियनशिप दिल्ली येथे 11 एप्रिल ते 13 एप्रिल 2025 दरम्यान झालेल्या विविध स्पर्धांमध्ये पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील नालासोपारा येथील खेळाडू जनार्दन महादेव टेमकर यांनी सिनियर गटात भरघोस यश संपादन करीत महाराष्ट्र राज्याला पाच सुवर्णपदक जिंकून देऊन पालघर जिल्ह्यासह वसई तालुक्याचीही मान उंचावली आहे.
दिल्ली येथे झालेल्या भारतीय खेलो मास्टर्स गेम्स राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत देशातील एकूण 16 राज्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये ॲथलेटिक्स, स्विमिंग आणि सांघिक खेळांच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या विविध स्पर्धेत महाराष्ट्रातील 62 वर्षीय खेळाडू जनार्दन महादेव टेमकर यांनी 60 वर्षांवरील सिनियर गटात भरघोस यश संपादन केले आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विविध स्पर्धांमध्ये ही टेमकर यांनी सहभागी होऊन अनेक बक्षिसे मिळविली आहेत आणि आज 60 वर्षांवरील वयोगटात महाराष्ट्राला पाच सुवर्ण पदक जिंकून देणारे ते एकमेव खेळाडू ठरले आहेत.
टेमकर यांनी 200 मीटर बॅक स्ट्रोक पोहणे स्पर्धेत सुवर्ण पदक, 100 मीटर ब्रेथ स्ट्रोक पोहणे स्पर्धेत सुवर्ण पदक, 50 मीटर बॅक स्ट्रोक पोहणे स्पर्धेत सुवर्ण पदक, 5000 मीटर चालणे स्पर्धेत सुवर्ण पदक, 50 वर्षांवरील कबड्डी स्पर्धेत सुवर्ण पदक अशी त्यांनी दिल्ली येथे पार पडलेल्या स्पर्धेत एकूण पाच सुवर्ण पदक जिंकून पालघर जिल्ह्याचे व महाराष्ट्र राज्याचे नाव देशात उंचावले आहे. या सुवर्ण पदकाच्या कामगिरीमुळे त्यांचे मित्र, खेळाडू, क्रीडाप्रेमी यांच्याकडून त्यांचे भरभरून कौतुक आणि अभिनंदन होत आहे. तसेच या स्पर्धेसाठी अध्यक्ष माजी आमदार क्षितिज ठाकूर, उपाध्यक्ष पंकज ठाकूर, पालघर जिल्हाध्यक्ष राजीव पाटील तसेच खेलो मास्टर्स गेम्स असोसिएशन महाराष्ट्र सचिव अमन चौधरी, प्रकाश वनमाळी, संदीप पंडित या सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले आहे.


Social Plugin