Type Here to Get Search Results !

माथेरानमध्ये प्रशासनाची कारवाई - 400 घोडे बेघर !

* मालवाहतूक ठप्प होण्याची भीती ; अश्वपाल महिलांचा कडाडून विरोध

* हेरिटेज माथेरानमध्ये ‘नो व्हेईकल झोन’, मालवाहतुकीचा आधारच हिरावला ?

* हॉटेल व्यावसायिक, पर्यटक, स्थानिक सेवा ठप्प होण्याची शक्यता

माथेरान / नरेश जाधव :- माथेरानच्या दस्तुरी नाका परिसरात आज प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे अंदाजे 400 मालवाहतूक व प्रवासी घोडे बेघर झाले आहेत. गेल्या चार पिढ्यांपासून घोडे व्यावसायावर जीवन जगणाऱ्या अश्वपाल समाजासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. नगरपालिका व महसूल विभागाने संयुक्तरीत्या घोड्यांचा प्लास्टिक शेड हटविल्याने मोठा तणाव निर्माण झाला आहे. या कारवाईच्या विरोधात अश्वपाल संघटनेच्या महिलांनी आक्रोश करीत प्रशासनाला जबर विरोध दर्शवला.


माथेरान हे "नो व्हेईकल" झोन क्षेत्र असल्याने येथे मालवाहतूक, बांधकाम साहित्य व जीवनावश्यक वस्तूंची ने-आण मालवाहतूक घोड्यांवर अवलंबून असते. दस्तुरी नाका येथे भूखंड क्र. 93 (5.5 एकर) मध्ये घोड्यांचे तबेले व शेड वर्षानुवर्ष उभारलेले होते. अश्वपाल समाजाने या भूखंडातून किमान 1 एकर जागा तबेल्यासाठी द्यावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे केली होती. मात्र, वाहतूक कोंडी व पार्किंग वाढत असल्याच्या कारणावरून नगर परिषद व पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तात कारवाई केली.


* अश्वपालांचा आक्रोश :- कारवाईदरम्यान महिलांचा संताप उसळला आणि त्यांनी घोषणाबाजी करून त्यांनी प्रशासनाला घेराव घातला. राकेश चव्हाण मालवाहतूक घोडे मालक म्हणाले की, आमचा व्यवसाय चार पिढ्यांचा आहे. आम्ही अनेकदा प्रशासनाकडे मागणी केली पण दुर्लक्ष झाले. दोन नोटीस देऊन आम्हाला उखडून टाकण्यात आले. आमच्या घोड्यांचा निवारा हिरावला गेला, आम्ही आमच्या जागेच्या मागणीवर ठाम आहोत.


* माथेरानची समस्या : पर्यटन & स्थानिक सेवा धोक्यात :- शेड हटविल्याने आता घोड्यांना कुठे ठेवायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पुढील काळात बांधकाम साहित्याची वाहतूक ठप्प, हॉटेल व्यावसायिक अडचणीत, पर्यटकांना वाहतुकीचा त्रास, घोड्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे, पर्यटनावर जगणाऱ्या माथेरानसाठी ही अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.


* प्रशासनाचे स्पष्टीकरण :- राहुल इंगळे मुख्याधिकारी, माथेरान नगरपरिषद म्हणाले की, भूखंड 93 वाहन पार्किंग व लॉजिस्टिक्ससाठी आरक्षित आहे. जिल्हाधिकारी आदेशानंतर कारवाई केली. घोडे माथेरानचे अविभाज्य घटक आहेत. त्यांचा विचार केला जाईल. संघटनांकडून जागेबाबत प्रस्ताव मागवले आहेत. वरिष्ठांशी चर्चा करून तोडगा काढू.


प्रशासन म्हणते - नियमांचे पालन केले, तोडगा काढू.

श्वपाल म्हणतात - जागा न मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही.

पर्यटनावर जगणाऱ्या माथेरानच्या दृष्टीने या प्रश्नाचा तातडीने तोडगा निघणे अत्यावश्यक आहे. माथेरानमधील ही कारवाई कायद्याची अंमलबजावणी की उपजीविकेवर गदा ? यावर आता मोठी चर्चा रंगली आहे. भूखंडाचा वाद सुटेपर्यंत माथेरानचे घोडे, अश्वपाल आणि पर्यटन तिन्ही आयसीयू (ICU) वर आहेत.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement