* स्थानिक प्रवाशांना भाडे नाकारून लांबच्या फेऱ्यांचा धंदा, महिलांना आणि लेकरांना होत आहे त्रास!
* ही रिक्षा सेवा नव्हे, दादागिरी आहे - कडाव ग्रामपंचायत सदस्य सुभाष शिंदे यांचा संतप्त आवाज!
खोपोली / प्रतिनिधी :- खोपोली हे औद्योगिक आणि पर्यटनदृष्ट्या जलद गतीने वाढणारे शहर असले तरी, येथील रेल्वे स्टेशनवरील रिक्षाचालकांनी नागरिकांना अक्षरशः ‘बंधक’ बनवले आहे! रिक्षा आहेत सार्वजनिक वाहतूक साधने पण खोपोली स्टेशन बाहेर उभ्या असलेल्या अनेक रिक्षा “सार्वजनिक” नव्हे तर “खासगी नफ्याच्या” मानसिकतेने चालविल्या जात आहेत!
* स्थानिक प्रवाशांना नकार, लांबच्या फेऱ्यांना प्राधान्य :- कडाव ग्राम पंचायत सदस्य व माजी उपसरपंच सुभाष मनोहर शिंदे यांनी सांगितले की, खोपोली स्टेशनला उतरल्यावर पहिल्याच डब्याबाहेर असलेल्या रिक्षा फक्त मठ व लांब अंतराच्या फेऱ्यांसाठीच तयार होतात. मोगलवाडी, काटरंग, प्रकाशनगर, मोहनवाडी, स्थानिक परिसरातील अल्प अंतराची भाडे ते थेट नाकारतात. “लोकल भाडे ? नको...जा पुढच्या रिक्षेत!” अशी थेट उर्मट प्रतिक्रिया प्रवाशांना ऐकायला मिळते. महिलांना आणि त्यांच्यासोबत असलेल्या लहान लेकरांना या असंवेदनशील वागणुकीचा रोज सामना करावा लागतो.
* ही वाहतूक नव्हे, त्रासाची व्यवस्था आहे - सुभाष शिंदे :- कडाव ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच सुभाष मनोहर शिंदे नुकतेच आपल्या बहिणीकडे खोपोलीत आले होते. रेल्वे स्थानकाबाहेर रिक्षा मिळवताना त्यांनाही हा कटू अनुभव आला. ते म्हणाले की, रिक्षा स्टेशनबाहेर उभ्या होत्या, पण स्थानिक ठिकाणी जाण्यासाठी एकही रिक्षा तयार नव्हती. प्रवाशांना नाहक त्रास दिला जातो. हे वर्तन रिक्षा व्यवसायाला नव्हे, तर खोपोलीच्या प्रतिमेलाच तडा देणारे आहे. महिलांना, लेकरांना या उन्हा-पावसात चालत जावे लागते, ही लाजिरवाणी गोष्ट आहे. अशा रिक्षाचालक संघटनेचा मी तीव्र निषेध करतो आणि प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करतो.
* प्रशासन, पोलिस आणि आरटीओ गप्प का ? :- या प्रकाराची दखल खोपोली शहरातील रिक्षा चालक मालक संघटना, स्थानिक पोलिस, लोकप्रतिनिधी आणि आरटीओ विभाग घेणार का ? असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. खोपोली हे मुंबई - पुणे महामार्गाजवळचे पर्यटन केंद्र असल्याने देशविदेशातील पर्यटकही येथे येतात. जर त्यांनाही अशाच अनुभवांना सामोरे जावे लागले, तर शहराची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर खराब होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
* स्थानिक लोकप्रतिनिधींची जबाबदारी :- रिक्षाचालकांचा हा कारभार थांबविण्यासाठी स्थानिक नगरसेवक, नगर परिषद अधिकारी आणि जनप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. गाव, तालुका, जिल्हा आणि राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करणारे प्रतिनिधी, जर नागरिकांच्या मूलभूत प्रवासाच्या समस्येकडे दुर्लक्ष करतील, तर मग ते प्रतिनिधी की केवळ फोटोसेशन नेते आहेत का ? असा सवाल नागरिकांमधून होत आहे.
* खोपोलीकरांचा ठाम इशारा :- स्थानिक प्रवाशांना भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांवर तातडीने दंडात्मक कारवाई करावी. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रिक्षा स्टँड व्यवस्था करावी. आरटीओ आणि पोलिसांनी दररोज स्टेशन परिसरात तपासणी मोहीम राबवावी. रिक्षाचालक संघटनेने आपल्या सदस्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात की, रिक्षा सार्वजनिक सेवा आहे, नफा मिळवण्याचे साधन नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.


Social Plugin