* “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे ब्रीदवाक्य की विनोद ?
* फलटणपासून कोल्हापूरपर्यंत पोलिस यंत्रणेचा गलिच्छ चेहरा उघडा पडला!
“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” - म्हणजे चांगल्यांचे रक्षण आणि वाईटांचे नाश. हेच महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य, हेच त्यांचे अस्तित्व. पण आज परिस्थिती अशी झाली आहे की, “रक्षकच भक्षक झालेत, आणि ब्रीदवाक्य भिंतीवर राहिलंय, मनात नाही!”
"सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" - हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य! याच ब्रीदवाक्याची शपथ घेऊन हजारो तरुणांनी देशसेवेसाठी पोलिस दलात प्रवेश केला. परंतु आज काही पोलिसांचे वर्तन पाहता असे वाटते, या शपथेचे ओझे त्यांच्या विवेकावरून गळून पडले आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
* फलटण हादरले...एका तरुण डॉंक्टरचा “न्याय” फाशी गेला :- डॉं. संपदा मुंडे - वय अवघे 29, हातात स्टेथोस्कोप, डोळ्यांत स्वप्ने आणि कर्तृत्वाची उमेद. आई-वडिलांनी दुष्काळात कष्ट करून मुलीला डॉंक्टर केले, पण तीच मुलगी पोलिस अत्याचाराची बळी ठरली! तिच्या हातावरची सुसाईड नोट पोलिस दलाला आरसा दाखवणारी होती..“माझ्या मृत्यूला फौजदार गोपाळ मदने जबाबदार आहे… त्याने माझ्यावर चार वेळा अत्याचार केला!”
ही ओळ वाचताना समाजच नाही, तर न्यायव्यवस्थेचे अंतःकरणही थरथरले पाहिजे होते! पण नाही - कारण आता आपण संवेदनाशून्य झालो आहोत. रक्षकांच्या युनिफॉर्मखाली भक्षकांचे मन तयार झालंय! डॉं. संपदा गेली…पण तिचा प्रश्न आजही जिवंत आहे - पोलिस ठाण्यात न्याय मागणाऱ्या महिलांची सुरक्षा कोण देणार ?
* कोल्हापूर हादरले... हवालदारच छापत होता बनावट नोटा :- सिद्धलक्ष्मी अमृततुल्य चहाच्या दुकानाच्या आडून पोलिस हवालदार इब्रार इनामदार कोट्यवधींच्या बनावट नोटा छापत होता. म्हणजे काय? “हातात लाठी आणि प्रिंटर दोन्ही!” आणि एवढे असूनही विभागात कोणी कानावर घेत नाही. हा गुन्हा नाही, हा देशद्रोह आहे. ज्या पोलिसांवर देशाचे रक्षण सोपवले, तेच आता चलनी नोटांचे भवितव्य ठरवतायत! हा वर्दीचा अपमान नाही, तर लोकशाहीवरचा थेट प्रहार आहे.
* दोन घटना नाहीत, ही “व्यवस्थेची कुज” :- हे फक्त फलटण आणि कोल्हापूर नाही. ही कुज प्रत्येक जिल्ह्यात पसरली आहे...भ्रष्टाचार, खंडणी, गुन्हेगारांशी संगनमत, महिलांवर अत्याचार, आणि जनतेवर मानसिक छळ... हे नवे सामान्य झालंय! वर्दीच्या आड आता ‘पॉवर’चा बाजार भरलाय. न्याय मागणारे लोक घाबरतात आणि गुन्हेगार पोलिसांशी सेल्फी काढतात, याला म्हणायचे कायद्याचे राज्य ? की गुन्हेगारांचे साम्राज्य ?
* प्रश्न पोलिसांचा नाही - पोलिसीतल्या माणसाच्या मृत्यूचा आहे :- संपदा मुंडे आणि बनावट नोटांचा हवालदार, हे दोन चेहेरे आहेत, पण कथा एकच आहे...वर्दीच्या आतला विवेक मेलाय. आज रस्त्यावरचा पोलिस कायद्याचा रक्षक नाही, तर सत्तेचा राबता झाला आहे. त्याच्या खिशात कायदा, आणि हातात बळ… पण अंतःकरणात काय ?
अर्थातच सर्व पोलिस दोषी नाहीत…हे सत्य आहे की काही अपवादात्मक अधिकारी अजूनही आपल्या शपथेप्रमाणे, निःस्वार्थ भावनेने कार्य करीत आहेत. कोणत्याही दबावाला न जुमानता, ते जनतेच्या सुरक्षिततेसाठी दिवस-रात्र झटत आहेत. अशा अधिकाऱ्यांचे समाजमनापासून कौतुक आणि संरक्षण होणे आवश्यक आहे. परंतु काहींच्या कृत्यांनी संपूर्ण पोलिस दलाच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
मग उपाय काय ? की फक्त घोषणांचे राजकारण करायचे ? जर खरंच शासनाला आणि पोलिस दलाला आपला सन्मान वाचवायचा असेल, तर घोषणांनी नव्हे, शुद्धीकरणाने सुरुवात करा.
* ठोस उपाय -
1. स्वतंत्र पोलिस आचरण आयोग - ज्यात न्यायमूर्ती, समाजसेवक, आणि महिला प्रतिनिधी असावेत.
2. प्रशिक्षणात नैतिकता, संवेदनशीलता आणि नागरिकांचा सन्मान हे विषय बंधनकारक करा.
3. अत्याचार सिद्ध झाल्यास थेट आजन्म सेवाबंदी!
4. प्रत्येक पोलिसाचे “सामाजिक प्रतिष्ठा मूल्यमापन” वार्षिक अहवालात बंधनकारक करा.
5. महिलांसाठी स्वतंत्र तक्रार केंद्र - जिथे “भीती” नव्हे, “विश्वास” असेल.
* रक्षक की भक्षक - आता निर्णय घ्या :- जेव्हा डॉंक्टर आत्महत्या करते आणि हवालदार बनावट नोटा छापतो, तेव्हा फक्त दोन व्यक्ती मरत नाहीत...मरतो समाजाचा विश्वास, मरते न्यायव्यवस्था, मरते माणुसकी. आज प्रश्न इतकाच नाही की “गोपाळ मदने दोषी का ?” प्रश्न आहे - आपण एवढे निष्क्रिय का ? पोलिसांबाबत भीती असावी, पण ती गुन्हेगारांना - सामान्य माणसाला नव्हे!
* अंतिम प्रश्न :- विश्वासाचा रक्तस्राव थांबवणार कोण ? जेव्हा रक्षकच भक्षक होतात, तेव्हा समाजाचे अंतरात्मा ओरडते, आता कुणावर विश्वास ठेवायचा ? पण ही केवळ टीकेची वेळ नाही, ही शुद्धीकरणाची वेळ आहे. या घटनांनी शासन, पोलिस दल आणि समाज या तिघांनाही आत्मपरीक्षण करायला भाग पाडले पाहिजे. जोपर्यंत “सद्रक्षणाय” हे ब्रीदवाक्य केवळ भिंतीवर लिहिले जाते आणि मनातून नाही...तोपर्यंत अशा डॉं. संपदा मुंडे पुन्हा पुन्हा बळी पडत राहतील...आणि “पोलिस” हा शब्दच समाजासाठी भयाचा पर्याय ठरेल. जेव्हा रक्षकच भक्षक होतात, तेव्हा देवही शांत राहतो… पण जनता नाही!
✍️ फिरोज पिंजारी (संपादक - दै. कोकण प्रदेश न्यूज)


Social Plugin