Type Here to Get Search Results !

भूमी किसान जनता पार्टीकडून दिवाळीनिमित्त सामाजिक उपक्रम आणि माता सावित्रीबाई फुले पुरस्कार सोहळा

* पनवेलमधील शाळा, औद्योगिक वसाहतींमध्ये भेटी घेऊन विद्यार्थ्यांना प्रेरणा

* 5 नोव्हेंबरला होणार गौरव सोहळा, भूमी किसान जनतेचा उपक्रम ठरणार आदर्श!

पनवेल / फिरोज पिंजारी :- सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणव्रतींप्रती कृतज्ञतेची भावना जोपासणाऱ्या भूमी किसान जनता पार्टीच्या वतीने दिवाळीच्या पवित्र सणानिमित्त एक आगळा-वेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल तालुक्यातील विविध औद्योगिक वसाहती, शिक्षण संस्था आणि शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच त्यांना प्रोत्साहनपर शुभेच्छा दिल्या. यावेळी 5 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित होणाऱ्या ‘माता सावित्रीबाई फुले पुरस्कार सोहळ्याची’ घोषणा करण्यात आली. या सोहळ्यात समाजातील गुणवंत विद्यार्थी, शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते, पत्रकार आणि समाजकारणात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे.


* विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि सन्मानाचा संदेश :- या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची प्रेरणादायी माहिती दिली. शिक्षण हा केवळ करिअरचा मार्ग नाही, तर समाज परिवर्तनाचे शस्त्र आहे, असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. या कार्यक्रमाद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना समाजकारण, शिक्षण आणि नवकल्पनांच्या दिशेने पुढे जाण्यास प्रोत्साहन देण्यात येणार आहे.


या उपक्रमाचे मार्गदर्शन महाराष्ट्र राज्याध्यक्ष दीपक निकम, महाराष्ट्र सचिव प्रमिला चव्हाण, राष्ट्रीय जनसंपर्क प्रतिनिधी मंदा दीपक पवार, सामाजिक कार्यकर्ते अण्णा हिंगमिरे तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष व लेखक - दिग्दर्शक आणि पत्रकार विक्रम गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा देत समाजातील शिक्षणाची गरज अधोरेखित केली.


* 5 नोव्हेंबरला सन्मान सोहळा :- 'माता सावित्रीबाई फुले पुरस्कार सोहळा 2025’ हा कार्यक्रम 5 नोव्हेंबर रोजी रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीसाठी प्रमाणपत्रे, सन्मानचिन्हे आणि प्रेरणादायी भेटवस्तू देऊन गौरवण्यात येईल. पक्षाने या निमित्ताने महिला शिक्षण, ग्रामीण विकास आणि सामाजिक समता यांसाठी नवे उपक्रम हाती घेण्याची घोषणाही केली आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement