Type Here to Get Search Results !

फलटण महिला डॉंक्टर आत्महत्या प्रकरणात नवे वळण

* भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर अडचणीत ?

* विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप

सातारा / प्रतिनिधी :- फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉंक्टरच्या आत्महत्येप्रकरणात राजकीय वाद अधिकच तीव्र झाला आहे. या प्रकरणात भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा अप्रत्यक्ष संबंध असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (ठाकरे गटाचे) नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.


दानवे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, आत्महत्या केलेल्या डॉंक्टर तरुणीवर राजकीय दबाव आणला गेला होता आणि यामध्ये माजी खासदार नाईक निंबाळकर यांचा सहभाग असल्याचे पुरावे त्यांच्या हातात आहेत.


* आत्महत्येपूर्वीच्या सुसाईड नोटमध्ये धक्कादायक उल्लेख :- डॉंक्टर तरुणीने ऐन दिवाळीत हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तीव्र आरोप करण्यात आले आहेत. सदर पत्रात पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने याने चार वेळा बलात्कार केल्याचा आणि त्याच्या सहकाऱ्याने प्रशांत बनकर याने मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. यासोबतच, भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहाय्यकांनीही रुग्णालयात येऊन डॉंक्टरवर दबाव आणल्याचे दानवे यांनी सांगितले. या तरुणीवर पोस्टमार्टेम रिपोर्ट व फिटनेस सर्टिफिकेट बदलण्यासाठी राजकीय दबाव आणण्यात आला होता. राजकीय हस्तक्षेपामुळे तिच्या मानसिक छळाला उधाण आले, असे दानवे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.



* ही केवळ आत्महत्या नाही, तर राजकीय दबावाचे भयानक उदाहरण :- अंबादास दानवे यांनी या घटनेचा दाखला देत सांगितले की, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉंक्टरने आपल्या पत्रात ‘राजकीय दबावामुळे माझे जगणे अवघड झाले आहे’ असे स्पष्ट नमूद केले होते. तिने उपअधीक्षकांकडे तसेच वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. पण तक्रार दुर्लक्षित करण्यात आली आणि अखेर तिने हे टोकाचे पाऊल उचलले. दानवे यांनी पत्रकार परिषदेसोबतच रात्री एक ट्विट करून या प्रकरणातील पुरावे सादर केले. त्यांनी सांगितले की, माजी खासदार नाईक निंबाळकर यांच्या दोन स्वीय सहाय्यकांनी राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक यांनी रुग्णालयात येऊन डॉंक्टर तरुणीला त्यांच्या ‘साहेबांशी’ फोनवर बोलायला भाग पाडले.



* राजकीय दबावाचा तपास करावा :- शिवसेनेने या प्रकरणात सत्ताधाऱ्यांकडून न्याय्य तपास होणार नाही अशी भीती व्यक्त केली आहे. दानवे यांनी सांगितले की, हे प्रकरण अत्यंत संवेदनशील आहे. गृहमंत्र्यांनी स्वतः याची जबाबदारी घेतल्याशिवाय तपासावर विश्वास ठेवता येत नाही. आम्ही मागणी करतो की माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सहआरोपी करण्यात यावे आणि सीआयडीमार्फत तपास करण्यात यावा.



* राजकीय वर्तुळात खळबळ :-  या आरोपांनंतर सातारा आणि फलटणसह संपूर्ण राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. एकीकडे पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असताना, आता भाजपच्या माजी खासदारांचे नाव पुढे आल्याने सत्ताधाऱ्यांसाठीही मोठं आव्हान उभे राहिले आहे.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement