Type Here to Get Search Results !

कोल्हारे ग्रामपंचायतीतील अनियमिततेचा ‘बॉम्ब’ फुटला!

* सदस्य विजय हजारे यांचा थेट सवाल : ही कार्यवाही रोखणारा आका कोण ?

* पत्रकार परिषदेत अनधिकृत बांधकाम, भ्रष्टाचार आणि सरपंचांच्या ‘भोंगळ कारभाराचा’ पर्दाफाश ?

* उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याची घोषणा!

कर्जत / नरेश जाधव :- कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत बांधकामे, भष्ट्राचार आणि अधिकार्‍यांच्या निष्क्रियतेविरुद्ध आवाज उठविणारे ग्रामपंचायत सदस्य विजय रामचंद्र हजारे यांनी रविवारी एक स्फोटक पत्रकार परिषद घेऊन ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहारांचा पर्दाफाश केला. गेल्या दहा वर्षांपासून तक्रारी, उपोषण आणि पत्रव्यवहार सुरू आहेत, पण कार्यवाही मात्र कागदावरच! अखेर ही कार्यवाही रोखतो कोण? आका कोण आहे ? असा थेट सवाल हजारे यांनी उपस्थित करीत ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि ग्राम अधिकारी यांच्या कारभारावर थेट बोट ठेवले.



* पत्रकार परिषदेत ‘फाईल्स’चा डोंगर आणि आरोपांचा पाऊस :- कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील नेरळ - कळंब राज्य मार्ग, नेरळ - भोपेले जिल्हा मार्ग आणि नेरळ - वाकास मार्ग यांच्यावरील गार्डन प्लॉट जागेत झालेल्या अनधिकृत बांधकामांचा तपशील हजारे यांनी समोर ठेवला. ते म्हणाले की, 2015 पासून सातत्याने मी शासन, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड जिल्हा परिषद आणि नेरळ विकास प्राधिकरण यांना तक्रारी दिल्या आहेत. पण नोटीसा फक्त फाईलमध्ये फिरतात, आणि कागदी घोडे धावतात. कार्यवाही मात्र कुणी ‘वरून’ थांबवते!


हजारे यांनी कागदोपत्री पुरावे दाखवत सांगितले की, ग्रामपंचायत सरपंच महेश विरले आणि ग्राम अधिकारी संजय राठोड यांनी ठराविक बांधकामदारांना परस्पर अनधिकृत नाहरकत प्रमाणपत्रे दिली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाचा परवानगीशिवाय बांधकामांना नाहरकत देणे हा स्पष्ट कायद्याचा भंग आहे.



* रस्ते झाले, पण कामाचा दर्जा मात्र धुळीत :- हजारे यांनी सांगितले की, माजी आमदार सुरेश लाड आणि माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या निधीतून करण्यात आलेली रस्त्यांची कामे आजही टिकून आहेत. पण विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून झालेली कामे महिनाभरातच निकामी होत आहेत. ठेकेदारांवर कोणताही अंकुश नाही, आणि गुणवत्तेचा पूर्ण बट्ट्याबोळ झाला आहे, असा आरोप हजारे यांनी केला.




* कार्यालय हलविण्यामागे ‘गौडबंगाल’ ? :- ग्रामपंचायत कार्यालयाच्या डागडुजीचा ठराव 8 जुलै 2024 रोजी मंजूर झाला, मात्र काम सुरू होण्याआधीच कार्यालय धामोते येथील खासगी गाळ्यात भाडेतत्त्वावर हलविण्यात आले, याकडे हजारे यांनी लक्ष वेधले. सरपंचांचा हा ‘गौडबंगाल’ आहे का ? ठराव मंजूर होण्याआधी कार्यालय हलविण्याचा अधिकार कोण दिला ? असा प्रश्न विचारत हजारे यांनी कर्जत पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी यावर केलेल्या लेखी ताशेर्‍याचाही दाखला दिला.




* लढा न्यायासाठी, थांबणार नाही :- पत्रकार परिषदेत हजारे यांनी स्पष्ट केले की, ही न्याय आणि प्रामाणिकपणासाठीची लढाई आहे. मी या भ्रष्ट कारभाराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे. गावाची मालमत्ता ही काही मोजक्या लोकांची जहागिरी नाही.



* स्थानिक राजकारणात खळबळ :- विजय हजारे यांच्या या पत्रकार परिषदेमुळे कोल्हारे परिसरात राजकीय आणि प्रशासनिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायतीतील अनेक ठराव, बांधकामे आणि परवानग्या आता तपासाअंतर्गत येण्याची शक्यता आहे. गावातील नागरिकांनी हजारे यांच्या भूमिकेचे स्वागत करीत म्हटले की, अनेक वर्षे दडवून ठेवलेला भ्रष्टाचार आता समोर येणारच. गावाची खरी ‘जनआवाज’ आता उठली आहे.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement