* रेडा गावात पवार परिवाराने 48 वी दिंडी वारी उत्साहात साजरी
* कोल्हापुरी फेटे, फटाक्यांची आतिषबाजी, तुळशी पूजन, चहापाणी ; पवार कुटुंबाच्या स्वागताने वारकरी भारावले
इंदापूर / प्रतिनिधी :- वारकरी परंपरेचा सुवर्णअध्याय लिहित रेडा (ता. इंदापूर, पुणे) गावातील पवार कुटुंबाने सलग 48 व्या वर्षी कार्तिकी वारीतील श्री क्षेत्र नागेश्वर दिंडी सोहळ्याचे भव्य स्वागत केले. कार्तिक शुद्ध त्रयोदशी, शुक्रवार, 28 ऑक्टोबर रोजी कौठा येथून प्रस्थान झालेल्या दिंडी सोहळ्याचे 28 ऑक्टोबर रोजी रेड्यात आगमन होताच तोफांची सलामी, फटाक्यांची आतिषबाजी करीत गावभर जल्लोष झाला.
* सुखदेव पवार परिवाराचा सत्काराचा अनोखा मान :- गावातील प्रमुख माजी ग्रामपंचायत सदस्य सुखदेव पवार यांच्या नेतृत्वाखाली, वारकरी परंपरेचा वारसा जपणाऱ्या पवार परिवाराने चार दशकांपासूनची सेवा परंपरा यंदाही उत्साहात कायम ठेवली. तुळशी पूजन, वारकऱ्यांचे चहापाणी, मान्यवर महिलांचे स्वागत, मानकरी व वडीलधाऱ्यांना कोल्हापुरी फेटे, फटाक्यांची आतिषबाजी या थाटामधील स्वागताने वारकरी मंडळी भावूक झाली.
* 4 पिढ्यांचा वारी सेवेचा वारसा :- पवार कुटुंबाचा वारकरी सेवेला वाहिलेला इतिहास शंभर वर्षांपेक्षा अधिक कालावधीचा असल्याचे सांगितले जाते. हभप रावसाहेब शिपलकर म्हणाले की, रेडा गावातील पवार कुटुंबातील तिसरी युवा पिढी वारकरी सेवेची परंपरा जपत आहे. हे भाग्य जन्मोजन्मीच्या पुण्यानेच मिळते.
* वारकऱ्यांची पंढरपूर यात्रा :- कौठा श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर ते पंढरपूर पायी यात्रा, पंढरपूरात संतराज मठात 4 दिवस मुक्काम, नगर प्रदक्षिणा, गोपाळकाला त्यानंतर परतीचा प्रवास. परमेश्वराच्या भेटीच्या ओढीने हा दिंडी सोहळ्यातील प्रत्येक वारकरी पायी चालत असतो. पंढरपूर मध्ये दिंडी सोहळा पोहोचल्यानंतर चार दिवस संतराज मठ पंढरपूर येथे मुक्काम असणार आहे. नगर प्रदक्षिणा करून, गोपाळ काला करून पुन्हा दिंडी सोहळा कौठा श्री क्षेत्र नागेश्वर मंदिराकडे परतीचा प्रवास सुरू करणार आहे.
* हरी नामाच्या ओढीने पंढरीकडे वाटचाल :- ऊन, पाऊस, वारा - संसाराची तमा न करता “विठ्ठल विठ्ठल”च्या जयघोषात वारकरी पुढे सरकतात. आश्रू-हास्य, भक्ती-भाव, डोळ्यांत विठू राया रेडा गावाने पुन्हा एकदा सिद्ध केले…वारी ही सोहळा नाही, ती संस्कृती आहे.
* रेडा गावातील ग्रामस्थांचे स्वागत इतर कुठेच नाही - हभप दत्तात्रय शिपलकर :- गेली 41 वर्ष रेडा गावातील ग्रामस्थ प्रेमाने आणि आनंदाने स्वागत करतात असे स्वागत व सेवा हे दिंडी प्रस्थान ते पंढरपूरपर्यंत इतर कुठेच होत नाही. गेली कित्येक वर्ष रेडा गावातील पवार परिवाराचे प्रमुख सुखदेव पवार आणि त्यांचे पुत्र पत्रकार कैलास पवार हे आमच्या दिंडी सोहळ्याचे अतिशय मोठ्या उत्साहात स्वागत करतात. दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत केले जाते. मोठ्या प्रमाणात फेटे बांधून, फटाक्याची आतिषबाजीने आमचे स्वागत केले. आमच्या दिंडी सोहळ्यातील प्रत्येक वारकरी अक्षरशः भारावून जातो. प्रत्येक वारकरी हा रेडा गावातील पवार कुटुंबाच्या स्वागताने सुखावून जातो.


Social Plugin