मुंबई / प्रतिनिधी :- रंगभूमी प्रयोग परिनिरिक्षण मंडळाच्या सदस्याच्या मानधनात 2500 वरून 5000 रूपये वाढ करण्याचा निर्णय शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाने घेतला आहे. यामुळे त्यानुसार रंगभूमी मंडळावरील सदस्यांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ झाली आहे.
रंगभूमी प्रयोग परिनिरिक्षण मंडळाकडून सार्वजनिक ठिकाणी सादर होणा-या मनोरंजनाच्या (नाटक, एकांकिका, लोकनाट्य, तमाशा, वग, मेळे) या कार्यक्रमासाठी नागरिकांनी सादर केलेल्या लिखाणांचे पूर्वपरिक्षण करुन त्यांना कायमस्वरुपी योग्यता प्रमाणपत्र देण्यात येते. सदर पूर्वपरिक्षणाचे काम शासनाने गठीत केलेल्या रंगभूमी मंडळातील अशासकीय सदस्याकडून केले जाते. सद्यस्थितीत रंगभूमी मंडळावर कार्यरत असणा-या अशासकीय सदस्यांना 2500 रुपये इतके ठोक दरमहा मानधन मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेतील नाट्य संहितेचे पूर्वपरिक्षण करण्यासाठी दिले जाते.
मागील 13 वर्षापासून मंडळावरील सदस्यांच्या दरमहा मानधनात वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे रंगभूमी मंडळाच्या सदस्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव रंगभूमी प्रयोग परिनिरिक्षण मंडळाने शासनास सादर केला आहे. त्यानुसार रंगभूमी मंडळावरील सदस्यांच्या मासिक मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. रंगभूमी प्रयोग परिनिरिक्षण मंडळावर कार्यरत असणा-या अशासकीय सदस्यांचे मानधन दरमहा 2500 वरून दरमहा रुपये 5000 रुपये पाच हजार रूपये इतके वाढविण्यास शासन निर्णयान्वये देण्यात येत आहे.


Social Plugin