* पत्रकार अशोक परदेशी यांचे भडगाव बसस्थानकात निवेदन
* बसफेऱ्या बंद झाल्याने 17 गावांचे प्रवासी, विद्यार्थी आणि वृद्ध नागरिक त्रस्त!
भडगाव / प्रतिनिधी :- भडगाव ते वाडे दरम्यानच्या काही बसफेऱ्या गेल्या 9 ते 10 दिवसांपासून अचानक बंद करण्यात आल्याने नागरिक, विद्यार्थी आणि वृद्ध प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर पत्रकार अशोक महादू परदेशी यांनी भडगाव बसस्थानकाचे वाहतूक निरीक्षक आर. एस. चौधरी आणि पाचोरा आगारप्रमुख यांना निवेदन देऊन बंद बसफेऱ्या तात्काळ सुरू करण्याची मागणी केली आहे.
* शाळांना सुट्या अन् बसफेऱ्याही सुट्टीवर ? :- पत्रकार परदेशी यांनी निवेदनात नमूद केले आहे की, भडगाव - वाडे मार्गांवर चालणाऱ्या काही बसफेऱ्या शाळांना सुट्या लागल्याच्या कारणावरून अचानक बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, या मार्गावर केवळ विद्यार्थीच नव्हे, तर शेतकरी, व्यापारी, शासकीय कर्मचारी तसेच वृद्ध नागरिकही प्रवास करतात. बसफेऱ्या बंद केल्याने अनेकांना कामासाठी जाण्या-येण्यात अडचणी येत आहेत आणि आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
* 17 गावांचे जनजीवन विस्कळीत :- भडगाव ते वाडे दरम्यानच्या मार्गांवर कोठली, वढधे, निंभोरा, लोणपिराचे, बोरनार, बोदर्डे, कनाशी, देव्हारी, गोंडगाव, सावदे, घुसर्डी, दलवाडे, नावरे, बांबरुड प्र. ब., वाडे, टेकवाडे बुद्रुक अशी जवळपास 17 गावे आहेत. या सर्व भागांतील विद्यार्थी, कामगार आणि शेतकरी वर्ग या बससेवेवर अवलंबून आहे. बसफेऱ्या बंद असल्याने या सर्व गावांतील नागरिकांना कामासाठी भडगाव शहरात येणे-जाणे अवघड झाले आहे.
* एसटीचेही आर्थिक नुकसान :- बसफेऱ्या बंद केल्याने प्रवाशांचेच नव्हे तर एस.टी. महामंडळाचेही उत्पन्न बुडत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. बस बंद ठेवल्याने प्रवाशांचे हाल होत असताना, महामंडळालाचाही महसूल घटतो आहे. त्यामुळे तात्काळ बंद बसफेऱ्या सुरू करून नियमित वाहतूक व्यवस्था पूर्ववत करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
* उपोषणाचा इशारा :- पत्रकार परदेशी यांनी निवेदनाच्या शेवटी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर भडगाव–वाडे बसफेऱ्या लवकरच सुरू केल्या नाहीत, तर प्रवासी वर्गांसह भडगाव बसस्थानकासमोर उपोषण व आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्व जबाबदारी महामंडळ प्रशासनाची असेल.
हे निवेदन वाहतूक निरीक्षक आर. एस. चौधरी यांना सादर करण्यात आले असून त्यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.


Social Plugin