* नगरदेवळा भक्तिभावाच्या महासागरात न्हाऊन निघणार!
* भक्तीच्या घोंगड्यात लपलेली परंपरा आणि परंपरेतून उमटणारा एकतेचा आवाज
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा व परिसरातील लाखों भाविकांच्या श्रद्धेचे आणि परंपरेचे प्रतीक असलेला श्री बालाजी महाराज रथोत्सव यावर्षी 3 नोव्हेंबरपासून मोठ्या उत्साहात सुरू होणार आहे. तब्बल तीन शतकांची परंपरा लाभलेला हा उत्सव नगरदेवळा गावाच्या ओळखीचा आधार आहे. भक्ती, श्रद्धा आणि एकोप्याचा संगम असलेला हा सोहळा 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगणार आहे.
* श्री बालाजी महाराज संस्थानचे आयोजन :- नगरदेवळा येथील श्री बालाजी महाराज संस्थान तर्फे दरवर्षी रथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्याची सुरुवात 3 नोव्हेंबर (सोमवार) रोजी पारंपरिक पालखी सोहळ्याने होणार असून, सायंकाळी 4 वाजता पालखी नगरदेवळा परिसरातून भव्य मिरवणुकीसह मार्गस्थ होईल. 4 नोव्हेंबर (मंगळवार) रोजी सायंकाळी 4 वाजता रथ मिरवणूक काढली जाणार आहे, तर 5 नोव्हेंबर (बुधवार) रोजी होणाऱ्या वाहनोत्सवाने रथयात्रेचा सोहळा परंपरेनुसार पार पडेल.
* भक्ती, अभंग आणि संस्कृतीचा उत्सव :- या तीन दिवसांच्या सोहळ्यात दररोज धार्मिक विधी, भजन, किर्तन, अभंग गायन, महिलांच्या भजनी मंडळाचे कार्यक्रम तसेच सांस्कृतिक उपक्रम आणि विविध सामाजिक सेवा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांच्या उत्साहात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री बालाजी महाराजांच्या रथयात्रेचा आनंद द्विगुणित होणार आहे.
* कुस्तीचा थरार आणि धार्मिक कार्यक्रमांचा मेळा :- उत्सवाच्या अखेरच्या दिवशी, 6 नोव्हेंबर (शुक्रवार) रोजी सकाळी 9 वाजल्यापासून सायं. 6 वाजेपर्यंत भव्य कुस्ती दंगल आयोजित करण्यात आली आहे. या दंगल स्पर्धेला पंचक्रोशीतील नामांकित मल्लांचा सहभाग लाभणार असून मार्केट भवन, नगरदेवळा येथे हा थरार अनुभवता येणार आहे.
* भक्तभावना, एकोपा आणि सुरक्षिततेची काळजी :- गेल्या 300 वर्षांपासून सुरू असलेला हा उत्सव आजही समान जोमाने साजरा होत आहे. भक्तांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन आणि ग्राम समितीने कडक बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले आहे. वाहतूक व्यवस्थापन, प्रकाश व्यवस्था आणि वैद्यकीय सुविधा यांचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
* उत्सव समितीचे आवाहन :- सर्व भाविक भक्तांनी श्री बालाजी महाराजांच्या रथोत्सवात सहभागी व्हावे, भक्तिभावाने श्रींचे दर्शन घ्यावे आणि या परंपरेच्या सोहळ्याला उजाळा द्यावा. श्री बालाजी महाराज संस्थानचे विश्वस्त, स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांनी या उत्सवासाठी मोठी तयारी केली असून गावकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.


Social Plugin