* नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर सकल आदिवासी महामोर्चात सहभागी व्हा - नागनाथ घिसेवाड
* कोळी महादेव, मल्हार कोळी, ढोर कोळी, टोकरे कोळी जमातींच्या न्यायहक्कांसाठी राज्यव्यापी तयारी वेगात
नांदेड / प्रतिनिधी :- “आता फक्त मागण्या नाहीत - हक्क हवेत, आणि ते मिळवूनच राहायचे!” अशा निर्धारपूर्ण शब्दांत आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते नागनाथराव घिसेवाड यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर होणाऱ्या राज्यस्तरीय सकल आदिवासी महामोर्चासाठी समाजबांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
रविवार, 26 ऑक्टोबर 2025 रोजी नांदेड येथील हॉटेल राजयोग गणराज पॅलेस, नमस्कार चौक येथे आदिवासी समाजातील अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते यांचा गौरव सोहळा आणि मोर्चा पूर्वतयारी मार्गदर्शन सभा पार पडली.
* न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही - नागनाथ घिसेवाड :- सभेत बोलताना घिसेवाड म्हणाले, सकल आदिवासी कोळी महादेव, मल्हार कोळी, ढोर कोळी आणि टोकरे कोळी समाजाला त्यांच्या ओळखीचा, आरक्षणाचा आणि सन्मानाचा हक्क मिळाला पाहिजे. नागपूर अधिवेशनात आपण लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून शासनाला दाखवून द्यायचे - आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही!
त्यांनी पुढे सांगितले की, जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र या दोन मुद्द्यांवर शासनाने ठोस निर्णय घेणे अत्यावश्यक आहे. न्यायालयीन पातळीवर व शासकीय यंत्रणेमध्ये सतत होणाऱ्या अन्यायाविरोधात या मोर्चातून ठोस भूमिका मांडली जाईल.
* मोर्चाचं रूपांतर आंदोलनात :- या महामोर्चाचे प्रमुख आयोजक दत्ताभाऊ सुरवसे (सोलापूर) आणि बाळासाहेब बळवंतकर (पंढरपूर) यांनी भाषणात स्पष्ट इशारा दिला आहे की, सरकारने जर आदिवासी समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर हा मोर्चा फक्त मोर्चा राहणार नाही, तो आमरण उपोषण आणि धरणे आंदोलनात रूपांतरित होईल.
त्यांनी सांगितले की, हा मोर्चा ‘अंत्यस्थ समाजाचा अंतिम लढा’ आहे. नागपूरच्या अधिवेशनात राज्यभरातून लाखोंचा जनसागर एकत्र जमून शासनाला जागवणार आहे.
* गौरव आणि सन्मान सोहळ्यात मान्यवरांचा सन्मान :- या कार्यक्रमात समाजातील मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. वसंतराव कलंबरकर, श्रीनिवास रोयलावार, गंगाप्रसाद मुदीराज, गोविंदराज सुर्यवंशी, गिरीधारी मोळके, माधवराव रेडेवाड बरबडेकर यांचा शाल, पुष्पहार, सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून मंचावर दत्ताभाऊ सुरवसे, बाळासाहेब बळवंतकर, परमेश्वर गोणारे, गिरीधारी मोळके, उद्योजक शशिकांत अण्णा भुसेवाड, मारोतीमामा मामीलवाड, आनंदा रेजीतवाड, केरबा जेठेवाड, वसंतराव कलंबरकर, केशवराव कुकूलवाड, विद्या पाटील, गुणवंत मिसलवाड यांची उपस्थिती लाभली. प्रास्ताविक दादाराव कोठेवाड यांनी तर सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर मरकंटे व माधव रेडेवाड यांनी केले. यावेळी मारोती बिचेवाड, सुनिल मुदिराज, गंगाधर अनपलवाड, डॉ. भगवान गुंजलवाड, इंजि. प्रमोद बुक्कावार, ॲड. जगताप पिल्लेवाड, महेश राऊत आदींची उपस्थिती उल्लेखनीय ठरली.


Social Plugin