Type Here to Get Search Results !

25 वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या!

* 'असुरवन’ सिनेमाचं रिलीज काही दिवसांवर असताना सचिन चांदवडेचा जीवनप्रवास थांबला...जळगावच्या उंदिरखेडे गावात हृदयद्रावक घटना!

जळगाव / प्रतिनिधी :- “लाइट्स, कॅमेरा... पण कट मात्र आयुष्यालाच!” जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे गावात घडलेली ही घटना मराठी सिनेसृष्टीला हादरवून गेली आहे. केवळ 25 वर्षांचा होतकरू अभिनेता सचिन गणेश चांदवडे याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सिनेमात झळकण्याचे स्वप्न पूर्णत्वाला येण्याच्या उंबरठ्यावरच त्याने आपले आयुष्य संपवले.


* ‘जामतारा 2’, ‘असुरवन’ आणि ‘विषय क्लोज’मधला कलाकार :-  सचिन चांदवडे हा फक्त अभिनयातच नव्हे, तर शिक्षणात आणि नोकरीतही यशस्वी होता. तो पुण्यातील प्रतिष्ठित आयटी पार्कमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. पण त्याची खरी ओळख अभिनेता सचिन चांदवडे!

‘असुरवन’ या आगामी मराठी चित्रपटात त्याची भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार होती. या चित्रपटाबाबत त्याने फक्त पाच दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर आनंद व्यक्त केला होता. तसेच तो नेटफ्लिक्सच्या ‘जामतारा सीझन 2’ मध्ये झळकणार होता. 'विषय क्लोज’ या लघुपटातही त्याने अभिनय केला होता. अभिनयाबरोबरच तो ढोल ताशा पथकात सक्रिय होता. गणेशोत्सव आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने अनेक मराठी कलाकारांसोबत त्याने ढोलवादन केल्याचे फोटो त्याच्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात.



* सिनेमाचा प्रकाश, पण मनात अंधार कायम :- सचिनने आत्महत्येचा प्रयत्न 23 ऑक्टोबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास केला. त्याने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीत पंख्याला गळफास घेतला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला खाली उतरवून खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रकृती खालावल्याने त्याला धुळे येथे हलविण्यात आले. परंतु, 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 1.30 वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला.



* बहुआयामी प्रतिभेचा अंत :-  सचिन हा हुशार, प्रतिभावान आणि संवेदनशील युवक म्हणून सर्वांना परिचित होता. गावात तसेच पुणे-मुंबईच्या कलावर्तुळात त्याचा चांगला वावर होता. अभिनय, नोकरी आणि सामाजिक कार्य या तिन्ही आघाड्यांवर तो उत्तम काम करत होता. मात्र, त्याच्या आयुष्यातील संघर्ष कोणालाच ठाऊक नव्हता. त्याच्या मृत्यूमुळे उंदिरखेडे गावात आणि सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.



* पोलिस तपास सुरू :- या घटनेप्रकरणी पारोळा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. सचिनच्या मोबाईल आणि सोशल मीडिया अकाऊंटच्या तपासातून काही धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



* स्मृतींच्या पडद्यावर कायम राहील सचिन :- गावातील आणि सिनेसृष्टीतील सर्वचजण एकच वाक्य म्हणत आहेत, अजून त्याने सुरूवातच केली होती… पण आयुष्याने शेवट लिहून टाकला.” त्याचं नाव असुरवनच्या क्रेडिट टायटल्समध्ये नक्की दिसेल, पण थिएटरमधील टाळ्यांचा आवाज मात्र तो ऐकू शकणार नाही.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement