Type Here to Get Search Results !

माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू करण्याची कार्यवाही गतीने करा - पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

* पर्यटन विकासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा वेगाने पूर्ण करा !

* सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ई-रिक्षा सुरू करण्याचे पाऊल तत्काळ उचला !

कर्जत / प्रतिनिधी :- पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी माथेरानमधील पर्यटनविषयक पायाभूत सुविधा आणि ई-रिक्षा सुरू करण्याच्या कार्यवाहीला गती देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. माथेरान हे महाराष्ट्रातील एकमेव वाहनमुक्त आणि पर्यावरण संवेदनशील पर्यटनस्थळ असून, सर्वोच्च न्यायालयाने येथे ई-रिक्षा सुरू करण्याबाबत आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित आढावा बैठकीत मंत्री देसाई यांनी संबंधित प्रशासन आणि विभागांना कठोर सूचना दिल्या.


* पर्यटन सुविधांचा दर्जा उंचवा :- मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, माथेरान हे राज्यातील अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. त्यामुळे येथे स्वच्छता, पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्था आणि पर्यावरण संवर्धन या सर्व बाबींचा विचार करून विकासकामांना वेग देणे अत्यावश्यक आहे.


त्यांनी पुढे सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने ई-रिक्षा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करून ई-रिक्षा सेवा सुरू करावी, जेणेकरून पर्यावरणपूरक आणि शांत पर्यटनाला चालना मिळेल.


* वाहनतळ भूखंड नगरपरिषदेकडे हस्तांतरित करा :- बैठकीदरम्यान मंत्री देसाई यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाला (MSRDC) निर्देश दिले की, माथेरान येथील आरक्षित वाहनतळाचा भूखंड विनामोबदला माथेरान नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्यात यावा. तसेच या ठिकाणी असलेल्या अतिक्रमणांवर त्वरित कारवाई करून हटवावीत, असे आदेश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.


* पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात संतुलन राखत विकास करा :- माथेरान हे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (Eco-sensitive Zone) असल्याने, येथील प्रत्येक विकासकामात पर्यावरणीय निकषांचे पालन करणे आवश्यक आहे. यावर मंत्री देसाई म्हणाले की, पर्यटन विकास आणि पर्यावरण संवर्धन यांचा समतोल राखतच पायाभूत सुविधा उभाराव्यात. माथेरान पर्यावरण संवेदनशील सनियंत्रण समितीने नियमितपणे ऑफलाइन बैठकांचे आयोजन करून प्रलंबित विषयांचा आढावा घ्यावा.


* बैठकीत उपस्थित मान्यवर अधिकारी व प्रतिनिधी :- या बैठकीस आमदार महेंद्र थोरवे, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉं. अतुल पाटणे, कोकण विभागीय आयुक्त डॉं. विजय सूर्यवंशी, पर्यटन संचालक डॉं. बी. एन. पाटील, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, श्रमिक रिक्षा चालक-मालक संघटना सचिव सुनील शिंदे, माजी नगरसेवक शिवाजी शिंदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.


* ई-रिक्षा हे पर्यावरणपूरक पर्यटनाचे भविष्य :- मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले की, माथेरानची ओळख नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरण यासाठी आहे. येथे ई-रिक्षा सुरू झाल्यास पारंपरिक हातगाड्या व पायदळ प्रवासाला पूरक पर्याय उपलब्ध होईल. ही योजना पर्यटकांसाठी सुलभ आणि स्थानिकांसाठी रोजगारवर्धक ठरेल.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement