Type Here to Get Search Results !

नगरदेवळ्यातील शिशू शिक्षणाला नवे बळ!

* 16 केंद्रांना मिळणार ‘स्मार्ट अंगणवाडी किट’

* अभिलाषा रोकडे यांच्या पाठपुराव्याला यश

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- नगरदेवळा गावातील लहान मुलांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासाला नवे तंत्रज्ञानाचे पंख लाभणार आहेत. गावातील सर्व 16 अंगणवाड्यांना ‘स्मार्ट अंगणवाडी किट’ देण्यास शासनाकडून मंजुरी मिळाली असून, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा अभिलाषा भिला रोकडे यांच्या पाठपुराव्यानंतर हा निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे गावातील अंगणवाड्या डिजीटल होतील तसेच अंगणवाड्यांची रंगरंगोटी व दुरूस्ती, सुधारणा होणार आहे.


महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी नगरदेवळा गावाच्या मागणीची दखल घेत ही मंजुरी दिली. यामुळे ग्रामीण भागातील पूर्व प्राथमिक शिक्षण अधिक आधुनिक, खेळ, गंमतयुक्त व परिणामकारक होणार आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रांचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रुपांतर करण्यासाठी "स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करुन देण्यासाठी 5469 अंगणवाडी केंद्रांकरीता एकूण रु. 89, 99, 78, 640 /- रुपये एवढ्या रक्कमेच्या "स्मार्ट अंगणवाडी किट" खरेदी करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.



* काय असेल किटमध्ये ? :- या अत्याधुनिक किटमध्ये खालील शैक्षणिक साधनांचा समावेश असेल. ज्यात डिजिटल लर्निंग साहित्य व मॉड्युल्स, शैक्षणिक खेळ आणि अ‍ॅक्टिव्हिटी मटेरियल, पोषण व आरोग्यविषयक जागरूकता साहित्य, शारीरिक विकासासाठी क्रीडा साहित्य, स्वच्छता व सुरक्षा साहित्य यामुळे मुलांचा बौद्धिक, भाषिक, सामाजिक आणि शारीरिक विकास अधिक प्रभावी होईल.


* शासनाचा 89 कोटी रुपयांचा उपक्रम :- महिला व बालविकास विभागाने राज्यभरात स्मार्ट अंगणवाडी किट वितरणास सुरुवात केली असून यासाठी 5469 अंगणवाडी केंद्रांकरीता एकूण रु. 89, 99, 78, 640 /- रुपयांचे बजेट मंजूर करण्यात आले आहे. ग्रामीण व शहरी भागातील पूर्व प्राथमिक शिक्षण डिजिटल पद्धतीने सक्षम करण्याचा हा उपक्रम मानला जात आहे.



* लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचा उत्साह :- राज्यातील पालक, कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. पूर्वी साध्या पद्धतीने चालणारी शिकवण आता डिजिटल आणि क्रियाशील होणार असल्याने मुलांच्या मेंदूविकास, भाषाविकास, सामाजिक कौशल्य आणि आरोग्यच्या विकासास मोठा हातभार लागेल, असे मत व्यक्त करण्यात आले.


* पारदर्शक व दर्जेदार अंमलबजावणीचे आदेश :- साहित्य वेळेत व गुणनियमानुसार पुरवले जावे यासाठी शासनाने गुणवत्तेची चाचणी, वेळोवेळी तपासणी, खात्रीशीर अहवाल हे अनिवार्य केले आहेत.



* स्मार्ट गाव, स्मार्ट शिक्षणाचा पाया :- महिला व बालविकास विभागाच्या या निर्णयामुळे व उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांच्या प्रयत्नामुळे नगरदेवळा गावात आता स्मार्ट बालशिक्षणाच्या दिशेने मोठे पाऊल टाकत आहे. ग्रामीण भागातील बालकांना शहरांप्रमाणे आधुनिक शैक्षणिक सुविधा मिळणार आहेत.


* ग्रामस्थांची प्रतिक्रिया :-  आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. आता स्मार्ट किटमुळे मुलांचे शिक्षण खेळता-खेळता अधिक आकर्षक आणि प्रभावी होईल. या निर्णयासाठी पालकांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथ शिंदे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे तसेच उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्षा अभिलाषा रोकडे यांचे आभार मानले आहेत.



Top Post Ad

Below Post Ad

Advertisement