* सरदार शिवराव कृष्णराव पवार विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा भावनिक मेळावा
* शाळा बदलली, इमारत बदलली, पण आठवणी तशाच कायम राहिल्या...”
* शिक्षक-विद्यार्थ्यांच्या भेटीत अश्रूंनी ओलावलं वातावरण!
नगरदेवळा / प्रतिनिधी :- शालेय जीवनाच्या आठवणी, निरागस गप्पा आणि भावनांचा महापूर... हे सगळे एकाच ठिकाणी पुन्हा अनुभवायला मिळाले ते नगरदेवळे येथे झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या “स्नेह मेळाव्यात...सरदार शिवराव कृष्णराव पवार विद्यालयातील सन 2005-2006 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल अठरा वर्षांनंतर पुन्हा एकत्र येत, जुन्या शालेय क्षणांना उजाळा दिला. या स्नेहमेळाव्याचे आयोजन 24 ऑक्टोबर 2025 रोजी शुक्रवारी करण्यात आले होते.
* शाळेच्या आवारात पाऊल टाकताच डोळ्यांत चमक आणि मनात गारवा :- माजी विद्यार्थी शाळेत पोहोचताच शिक्षकांच्या स्वागतासाठी शाळा सजली होती. भेटताक्षणी अनेकांचे डोळे पाणावले...कोण शिक्षकांना मिठी मारत होते, तर कोण बाकांवर बसून शालेय आठवणी सांगत होते. त्या काळात मोबाईल नव्हते, पण मनापासून जोडलेले धागे आजही तुटले नाहीत, असे सांगत अनेक शिक्षक आणि विद्यार्थी भावुक झाले.
* शिक्षकांचा सन्मान आणि विद्यार्थ्यांचा उत्साह एकत्र झळकला :- कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे. एस. कोकंदे सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य किरण काटकर सर आणि उपप्राचार्य व्हि. बी. गहरवाल सर उपस्थित होते. यावेळी बी. एफ. निकुंभ, डी. बी. पाटील, पी. के. शिरुडे, व्हि. बी. बोरसे, टी. ई. रोकडे, एस. एल. महाजन, डी. एस. पाटील, एस. पी. बावस्कर, एस. पी. माळी, डी. पी. राजपूत या शिक्षकांनी आपल्या आठवणी सांगत माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
* शिक्षक म्हणजे फक्त अध्यापन नव्हे, तर आयुष्याचा पाया :- प्राचार्य किरण काटकर सर म्हणाले की, आजचा हा स्नेहमेळावा म्हणजे केवळ पुनर्भेट नाही, तर आपल्या शिक्षणसंस्थेच्या संस्कारांची जिवंत झलक आहे. शिक्षकांना विसरणे शक्यच नाही, कारण त्यांच्या शिकवणुकीतूनच आज अनेक विद्यार्थी आयुष्यात उंच भरारी घेत आहेत.
* विद्यार्थ्यांचा उत्साह आणि शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त :- माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करीत तुमच्यामुळे ।आम्ही आज समाजात उभे राहू शकलो. जीवनात कितीही पुढे गेलो तरी या शाळेचा सुगंध कधी विसरणार नाही, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रांत बोरसे यांनी केले, तर आभार प्रदीप सोमवंशी यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निखिल शिरुडे, सागर पाटील, निकेत निकुंभ, सारंग दुसाने, लक्ष्मण शेलार, कपिल परदेशी, मनोज पाटील, प्रशांत भावसार, भावना शिरुडे, अल्फा थेपडे आणि सर्व माजी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विशेष प्रयत्न केले. शिक्षकेत्तर कर्मचारी विजय राजपूत, राजू खोकर, वृषाल पाटील यांच्या सहकार्याने कार्यक्रम सुरळीत पार पडला.
* शाळा संपली, पण नातं नाही... :- कार्यक्रमाच्या अखेरीस सर्वांनी पुन्हा भेटण्याचा शब्द देत एकमेकांना मिठ्या मारल्या. शाळेच्या आवारात पुन्हा एकदा “सर आठवतात ना ?” अशा गप्पा रंगल्या आणि स्नेहाचा, आदराचा आणि आठवणींचा एक सुंदर अध्याय पुन्हा लिहिला गेला.


Social Plugin