नाशिक / प्रतिनिधी :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथे '38 वे अखिल भारतीय महानुभाव परिषद अधिवेशन' पार पडले. भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा आशीर्वाद घेण्याकरिता या ठिकाणी आलो असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या माध्यमातून सांगितले आहे की, ज्यावेळी धर्मावर ग्लानी येईल, समाजात भेदभाव निर्माण होईल आणि ज्यावेळी समाज धर्माच्या मार्गांवरून पथभ्रष्ट होईल, तेव्हा मीच विविध रूपांनी जन्म घेऊन समाजाला पुन्हा सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न करेन. भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी अवतार घेतला, त्या काळातही समाज पथभ्रष्ट झाला होता. समाजातील भेदाभेद आणि विषमतेमुळे एक वेगळी व्यवस्था निर्माण झाली होती. समाज जात, पंथ आणि भाषेच्या वेगवेगळ्या दऱ्यांमध्ये विभागला गेला होता. अशा परिस्थितीत संपूर्ण समाजाला एका सूत्रात बांधण्याचे आणि सर्वांना एक सन्मार्ग दाखविण्याचे कार्य भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि एकूणच महानुभाव विचाराने केले, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
मराठी भाषेच्या अभिजाततेचा आद्य पुरावा म्हणजे दोन ग्रंथ - ज्ञानेश्वरी आणि लीळाचरित्र. महानुभाव विचार रुजवताना मराठी भाषा रुजविण्याचे काम महानुभाव पंथाच्या साहित्यामधून झाले आहे. आपण किती समृद्ध विचार घेऊन चालत होतो याची प्रचिती महानुभाव पंथाच्या साहित्य वाचल्यास येते. महानुभाव पंथांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये 3-4 ग्रंथांचे प्रकाशन होतेच, त्यामुळे खऱ्या अर्थाने ही विचारांची परंपरा आहे आणि ती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम ग्रंथांच्या माध्यमातून होत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
महानुभाव पंथाने कधीही पंथाचा मार्ग सोडला नाही. आजही हा पंथ केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर अफगाणिस्तानपर्यंत पोहोचलेला दिसतो. भारतातील कोणत्याही राज्यात गेले तरी महानुभाव पंथाचे कार्य करणारे लोक आजही भेटतात. त्यासोबत, रिद्धपूर हे मराठी भाषेला जिवंत ठेवणारे ठिकाण आहे त्यामुळे रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यासाठी सरकार पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
यावेळी मंत्री गिरीष महाजन, मंत्री दादाजी भुसे, आमदार देवयानी फरांदे तसेच महानुभाव पंथाचे संत-महंत, मठाधिपती व इतर मान्यवर उपस्थित होते.


Social Plugin