Type Here to Get Search Results !

निर्धारातून पुन्हा भगवा !

* आमदार किशोर पाटील यांचा 1 नोव्हेंबर रोजी ‘निर्धार मेळावा’ 

* भाजपवर हल्लाबोल, उमेदवारीवर उत्सुकता आणि कार्यकर्त्यांमध्ये जोश ? 

पाचोरा / फिरोज पिंजारी :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा (शिंदे गट) रणशिंग पुन्हा वाजणार आहे. शिवसेनेचे आमदार किशोर आप्पा पाटील 1 नोव्हेंबर रोजी भव्य “निर्धार मेळावा” घेणार असून, या मेळाव्यातून ते शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य, जोश आणि लढाऊ आत्मविश्वास फुंकणार आहेत. हा निर्धार मेळावा केवळ सभा नाही, तो राजकीय रणघोष ठरण्याची चिन्हे आहेत. कारण पाचोरा-भडगाव तालुक्यात सध्या राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.



* शिवसेनेचा भगवा पुन्हा झळकणार :- या मेळाव्याचे उद्दिष्ट स्पष्ट आहे की, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषद निवडणुकांवर भगवा पुन्हा फडकवायचा. आमदार किशोर आप्पा पाटील हे पक्षातील सैनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्यासोबतच विरोधकांचा “खरपूस समाचार” घेणार असल्याची चर्चा आहे. विशेषतः भाजपचे आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार दिलीप वाघ, वैशाली सुर्यवंशी, अमोल शिंदे आणि भाजपचे संकटमोचक गिरीष महाजन यांना उत्तर देताना आप्पा काय सांगतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



* युती बिनसली, विरोधक एकत्र :- मागील काही महिन्यांत भाजप-शिवसेना युतीत तडा गेल्याने दोन्ही पक्ष स्वबळाचा नारा देत मैदानात उतरले आहेत. दुसरीकडे विरोधकांची एकी आणि संघटित रणनीती सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर निर्धार मेळावा म्हणजे केवळ सभा नाही, तर शिवसेनेच्या नव्या युद्धाची घोषणा मानली जात आहे.


* उमेदवारीबाबत रहस्य कायम :- स्थानिक राजकारणात सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे नगरदेवळा जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार कोण ? नगरदेवळा पंचायत समितीत इच्छुकांची भाऊगर्दी आहे तर पाचोरा व भडगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठीही अनेक नावे चर्चेत आहेत. आमदार पाटील या मेळाव्यात उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार का ? हा प्रश्न प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे.


* राजकीय रंगमंच तापला :- “निर्धार मेळावा”च्या घोषणेनंतर भाजप आणि विरोधकांच्या खेम्यातही हालचाल सुरू झाली आहे. दोन्ही गटांच्या नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण “निर्धारातून सत्ता” मिळविण्याचा आत्मविश्वास मात्र आमदार पाटील यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. शिवसेना हा भावनांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांचा निर्धार म्हणजेच आपली ताकद, असे विधान आप्पांना माहित असल्याने या सभेतून विजयाचा निर्धार करण्यात येणार आहे.


* 1 नोव्हेंबरचा दिवस ठरणार निर्णायक :- 1 नोव्हेंबर रोजी आमदार किशोर आप्पा पाटील यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्त व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून शिवसेना व आमदार किशोर आप्पा पाटील आपला निवडणूक रणनितीचा रोडमॅप जाहीर करणार असून उमेदवारीच्या चर्चा आणि घोषणांमुळे पाचोरा-भडगावचे राजकारण नव्या वळणावर जाण्याची शक्यता आहे.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement