* सेंद्रिय शेती, आरोग्य व समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल
नांदेड / प्रतिनिधी :- महाराष्ट्र वाहतूक विभागात अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडताना समाज कार्य व सेंद्रिय शेतीचा प्रसार करीत मानवतावादी कार्य करणाऱ्या मोटार वाहन निरीक्षक वसंतराव कलंबरकर (पुणे) यांना प्रतिष्ठित राष्ट्रीय कृषीरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. रत्नागिरी येथील
स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात झालेल्या या भव्य सोहळ्यात पूर्व ब्रिगेडीयर सुधीर सावंत, कुणबी मराठा समाजाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव आणि महात्मा फुले शिक्षण परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष व्यंकटराव जाधव यांच्या हस्ते गौरवचिन्ह, प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
महात्मा फुले शिक्षण परिषदेतर्फे जाहीर करण्यात आलेला हा पुरस्कार राज्यातील समाजसेवा, शेती आणि मानव कल्याण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या आधारे दिला जातो.
सत्कारानंतर बोलताना वसंतराव कलंबरकर म्हणाले की, संगणकीकरणाच्या युगात माणूस मानसिक आणि शारीरिक ताणतणावाखाली जगत आहे. प्रदूषित हवा, दूषित अन्न आणि विषारी मानसिकता यावर एकमेव उपाय म्हणजे सेंद्रिय शेती आणि शुद्ध अन्नसंस्कृती...समाजाने परत निसर्गाकडे व पर्यावरणपूरक शेतीकडे वळले पाहिजे. त्यांनी सेंद्रिय अन्न, विषमुक्त शेती, शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि सामाजिक जागृती या क्षेत्रात सक्रिय योगदान दिल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सन्मानाबद्दल विविध समाजसेवक, शिक्षक, उद्योजक व नागरिकांनी शुभेच्छा दिल्या. त्यात नागनाथराव घिसेवाड, डॉं. गोविंद नांदेडे, महेश होलानी, गोविंदराव घोरबांड, शिवाजी नाईकवाडे यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग होता.
महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करीत सरकारी सेवेत राहूनही समाजहितासाठी कार्य करणाऱ्या कलंबरकर यांचे हे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी असून ग्रामीण विकास, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश त्यांच्या योगदानातून मिळतो.
वसंतराव कलंबरकर यांना राष्ट्रीय कृषीरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील सामाजिक व मानवतावादी कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.


Social Plugin