Type Here to Get Search Results !

पनवेल येथे ‘सरदार@150 युनिटी मार्च’ आणि ‘विकसित भारत पदयात्रा’

* राष्ट्रीय एकता, सामाजिक जबाबदारी आणि देशभक्तीचा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक पदयात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - रायगड जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे

रायगड-अलिबाग / प्रतिनिधी :- पनवेल शहरात ‘सरदार@150 युनिटी मार्च’ आणि ‘विकसित भारत पदयात्रा’ हा भव्य उपक्रम १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचे आयोजन युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत माय भारत केंद्र रायगड, पनवेल महानगरपालिका, जिल्हा प्रशासन रायगड, राष्ट्रीय सेवा योजना आणि सीकेटी महाविद्यालय, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

या पदयात्रेचे उद्दिष्ट राष्ट्रीय ऐक्य, सामाजिक जबाबदारी, आणि तरुणांमध्ये देशभक्तीचा भाव जागृत करणे असे असून, या माध्यमातून सर्व वयोगटातील नागरिकांना एकसंध भारताच्या निर्मितीचा संकल्प करण्यास प्रवृत्त केले जाणार आहे.


* उपक्रमाची पार्श्वभूमी :- भारत सरकारने ६ ऑक्टोबर २०२५ रोजी माय भारत पोर्टल वरून ‘सरदार@150 युनिटी मार्च’ या देशव्यापी डिजिटल मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमेत सोशल मीडिया रील स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, ‘सरदार@150 यंग लीडर्स प्रोग्राम’ यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रोग्राममधील १५० विजेत्यांना राष्ट्रीय पदयात्रेत सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे, असे आयोजकांनी सांगितले.


* दोन टप्प्यातील राष्ट्रीय मोहिम :- जिल्हा स्तरावरील पदयात्रा (८ ते १० कि.मी.) या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातून ६ ते ८ कि. मी. लांबीची पदयात्रा काढली जाईल. या निमित्ताने शाळा व महाविद्यालयांमध्ये निबंध, वादविवाद, परिसंवाद, पथनाट्य, तसेच नशामुक्त भारत, ‘अभिमानाने स्वदेशी’ आणि स्वच्छता मोहिम यांसारख्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाईल. पदयात्रेदरम्यान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस अभिवादन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण देखील केले जाईल.


राष्ट्रीय पदयात्रा (२६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२५) ही पदयात्रा करमसद (पटेल यांचे जन्मस्थान) ते केवडिया (स्टॅच्यू ऑफ युनिटी) दरम्यान होणार असून, १५२ कि.मी. अंतराचा प्रवास यात होईल. मार्गावरील गावांमध्ये सामाजिक विकास उपक्रम, “डेव्हलपिंग इंडिया प्रदर्शन” आणि “सरदार गाथा” सादर केली जाणार आहे.


* नागरिक आणि तरुणांसाठी आवाहन :- रायगड जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांनी सांगितले की, या उपक्रमाचा हेतू तरुणांमध्ये देशाभिमान, एकता आणि सामाजिक जबाबदारीची भावना जागृत करणे हा आहे. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी सर्वांनी या पदयात्रेत सहभागी व्हावे.

नोंदणी आणि सहभाग सर्व नोंदणी माझे भारत पोर्टलवर https://mybharat.gov.in/pages/unity_march सुरू आहेत.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मृतीला अभिवादन, राष्ट्रभक्तीपर सांस्कृतिक सादरीकरणे, विद्यार्थी आणि युवकांसाठी प्रेरणादायी उपक्रम, “स्वदेशीचा अभिमान” आणि “नशामुक्त भारत” शपथ अभियान असे उपक्रम राबविले जातील.

‘सरदार@150 युनिटी मार्च’ आणि ‘विकसित भारत पदयात्रा’ हा उपक्रम केवळ राष्ट्रपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन करणारा नाही, तर देशातील तरुणाईला एकात्मता, स्वावलंबन आणि प्रगतीचा नवा संदेश देणारा उपक्रम आहे. पनवेल परिसरातील नागरिकांनी या ऐतिहासिक पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासन व आयोजकांनी केले आहे. 


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement