Type Here to Get Search Results !

तब्बल 99 वेळा रक्तदान करून मानवतेचा आदर्श

* समाजसेवक संदेश बेडेकरांचा गौरव : स्पाईस रेस्टॉरंटचा सामाजिक उपक्रम ठरला प्रेरणादायी

अलिबाग / ओमकार नागावकर :- “रक्तदान हे श्रेष्ठदान” या उदात्त विचाराची जाणीव ठेवत चौल - रेवदंडा परिसरातील स्पाईस रेस्टॉरंट एक वेगळी सामाजिक ओळख निर्माण करीत आहे. स्वादिष्ट खाद्यपदार्थांसोबत सामाजिक बांधिलकीही जोपासत, या रेस्टॉरंटतर्फे ‘एक पाऊल समाजासाठी’ या उपक्रमांतर्गत 4 नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


या शिबिरात तब्बल 99 वेळा रक्तदान करून मानवतेचा नवा आदर्श निर्माण करणारे समाजसेवक संदेश बेडेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या निःस्वार्थी सेवाभावाचे मान्यवरांनी मनापासून कौतुक केले.


* सामाजिक भावनेचा गौरव :- स्पाईस रेस्टॉरंटचे मालक केदार मळेकर हे केवळ खाद्यसंस्कृतीचे वाहक नसून समाजहितासाठी जागरूक असलेले उद्योजक म्हणून परिसरात ओळखले जातात. गेल्या चार वर्षांपासून ते विविध सामाजिक उपक्रमांद्वारे मानवतेचा प्रकाश पसरवत आहेत.


या शिबिराचे उद्‌घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी चौल ग्रामपंचायत उपसरपंच अजित गुरव, विभाग प्रमुख मारुती भगत, उपविभाग प्रमुख शैलेश घरत, शाखा प्रमुख अशोक नाईक, दिपेश पाटील, डॉं. समीर धाटावकर तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. शिबिराचे संचालन डॉं. दीपक गोसावी व टीम यांच्या माध्यमातून कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.


* रक्तदान म्हणजे जीवदान - जिल्हाप्रमुख म्हात्रे :- यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे म्हणाले की, रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नाही, तर मानवतेचे सर्वात मोठे दान आहे. स्पाईस रेस्टॉरंटसारखे उपक्रम समाजात मानवता जिवंत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.


* चवच नाही, मानवतेचा सुगंधही :- उपक्रमाच्या भावनेबाबत बोलतांना आयोजक केदार मळेकर म्हणाले की, अन्न देणे म्हणजे शरीराला ऊर्जा ; पण रक्तदान म्हणजे जीव वाचवण्याची सेवा. म्हणूनच स्पाईस रेस्टॉरंट चवीसोबत मानवतेचे समाधान देण्याचा प्रयत्न करीत आहे.


या उपक्रमातून रक्तदानाचे महत्त्व, सामाजिक बांधिलकी, उद्योजकांची सामाजिक भूमिका यांची जाणीव नव्या पिढीला झाली. स्वाद आणि सद्भावना यांचा मेळ घालणारे स्पाईस रेस्टॉरंट खऱ्या अर्थाने समाजसेवेची चवदार प्रेरणा ठरले आहे.


Top Post Ad

Below Post Ad

Advertisement