Type Here to Get Search Results !

पुण्यात नवले पुलावर भीषण अपघात


* 8 जण जिवंत जळाले, 20 हून अधिक जखमी

* ब्रेक फेल झालेल्या कंटेनरनं 25 वाहनांना दिली धडक

* सीएनजी कारच्या स्फोटानं दोन्ही कंटेनर पेटले

* महामार्गाच्या रचनेतील त्रुटींमुळे वारंवार अपघात

पुणे / प्रतिनिधी :- पुण्यातील नवले पूल परिसरात आज संध्याकाळच्या सुमारास अत्यंत भीषण असा अपघात घडला. राजस्थान पासिंग असलेल्या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे या वाहनाने अचानक नियंत्रण सुटून जवळपास 20 ते 25 वाहनांना जोरदार धडक दिली. या विक्राळ साखळी अपघातात 8 जण जिवंत जळून मृत्युमुखी पडले असून 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


* अपघात कसा झाला ? :- साताऱ्याहून मुंबईकडे जाणारा एक कंटेनर नवले पूलाजवळील मंद उतारावरून वेगाने खाली येत होता. उतारावर अनेक लहान गतीरोधक असल्यामुळे वाहनाचा ब्रेक फेल झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. ब्रेक निकामी होताच कंटेनर वेगावर नियंत्रण न ठेवता समोरच्या सलग वाहनांना धडकत पुढे जात राहिला. धडकेमध्ये एका सीएनजी कारला सर्वात मोठा फटका बसला. ही कार दोन कंटेनरमध्ये अडकली आणि क्षणात तिचा चेंदामेंदा झाला. सीएनजी सिलिंडरचा स्फोट होताच कारने पेट घेतला व मागील कंटेनरलाही आग लागली. भीषण आगीने कारमधील प्रवासी जिवंत जळाले.


* मृतदेहांची स्थिती आणि बचावकार्य :- घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा तात्काळ पोहोचल्या. कारमधून दोन महिला आणि एका मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. कंटेनरमधून एक मृतदेह सापडला आहे. आणखी काही मृतदेह वाहनांमध्ये अडकले असल्याची शक्यता असल्याने शोधकार्य सुरू आहे. सर्व जखमींना जवळच्या विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती गंभीर आहे.


* डीसीपी संभाजी कदम यांची माहिती :- डीसीपी संभाजी कदम यांनी प्राथमिक माहिती देताना सांगितले की, कंटेनरचा ब्रेक उतारावर फेल झाला असावा, त्याची चिन्हे रस्त्यावर दिसत आहेत. सध्या घातपाताची शक्यता नाकारण्यात आली आहे. अडकलेल्यांना बाहेर काढणे आणि वाहतूक सुरळीत करणे हे पहिले प्राधान्य आहे. दोन मोठ्या वाहनांना हटविण्यासाठी क्रेन बोलावण्यात आल्या आहेत. अपघाताचे नेमके कारण सविस्तर तपासानंतर स्पष्ट होईल.


* नवले पूल - अपघातांचे हॉटस्पॉट का ? :- नवले पूल परिसरात हे अपघाताचे पहिले प्रकरण नाही. येथे वारंवार भीषण अपघात होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. कात्रज बोगद्यानंतर तीव्र उतार, त्या ठिकाणी धोकादायक वळण, सर्व्हिस रोड दोन्ही बाजूंनी येऊन महामार्गात मिसळतो, अवजड वाहनांचे नियंत्रण सुटण्याची वारंवार शक्यता, महामार्ग रचनेतील गंभीर त्रुटी अशी या मागची कारणे आहेत, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. महामार्ग प्राधिकरणाकडून फक्त तात्पुरते उपाय केले जातात, मात्र कायमस्वरूपी तोडगा अद्याप निघाला नाही. त्यामुळे नागरिकांनी लोकप्रतिनिधींना या पुलावर कायमस्वरूपी सुधारणा करण्याची मागणी केली आहे.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement