* पानिपत कुस्ती स्पर्धेत ब्राँझ पदक विजेती ; जिद्द, मेहनत आणि सातत्याने घडवला यशाचा नवा इतिहास!
खोपोली / दिनकर भुजबळ :- खोपोलीच्या भूमीतून पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात अभिमानास्पद यशाची नोंद झाली आहे. येथील उदयोन्मुख कुस्तीगीर लावण्या दिलीप देशमुख हिने पानिपत (हरियाणा) येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत दमदार खेळ सादर करीत ब्राँझ पदक (तिसरा क्रमांक) पटकावला आहे. तिच्या या पराक्रमामुळे संपूर्ण रायगड जिल्हा आणि खोपोलीकरांचा अभिमान दुणावला आहे.
* लावण्याची यशस्वी वाटचाल :- लावण्याने आपल्या कुस्ती प्रवासाची सुरुवात २०१७ साली केली. अवघ्या काही वर्षांतच ती राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पदकविजेती ठरली आहे.
२०१८ : राज्यस्तरीय कास्यपदक
२०२२ : राज्य अजिंक्यपद रौप्य
२०२३ : ताराराणी केसरी (रौप्य), कोकण केसरी (सुवर्ण)
२०२४ : मावळ केसरी (सुवर्ण), राज्यस्तरीय रौप्य
२०२५ : राज्यस्तरीय सुवर्णपदक आणि आता राष्ट्रीय स्तरावर ब्राँझ पदक
* खोपोलीचा झेंडा राष्ट्रीय स्तरावर :- हरियाणातील पानिपत येथे देशभरातील नामांकित खेळाडूंमध्ये लावण्याने उत्कृष्ट कामगिरी करीत तिसरा क्रमांक पटकाविला. तिच्या या कामगिरीचे कौतुक विधितज्ञ मीनाताई बाम, नागरी सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा वर्षा मोरे आणि ज्येष्ठ पत्रकार दिनकर भुजबळ आदींनी विशेष शब्दांत केले आहे.
* मेहनत, जिद्द आणि सातत्य यशाची गुरुकिल्ली :- लावण्या देशमुखच्या खेळातील सातत्य, प्रशिक्षणातील शिस्त आणि कठोर मेहनतीमुळेच ती आज राष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे. तिच्या या यशामागे प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि कुटुंबाचा प्रचंड पाठिंबा लाभला आहे.
* प्रेरणादायी उदाहरण :- महिला खेळाडूंसाठी लावण्याचा हा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे. ग्रामीण भागातील तरुणींनी खेळाच्या माध्यमातून नाव कमवावे, या उद्दिष्टासाठी तिचे हे यश महत्त्वपूर्ण ठरले आहे.
लावण्याच्या यशानंतर संपूर्ण खोपोलीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिचे स्वागत आणि सत्कार करण्यासाठी विविध संघटना आणि क्रीडाप्रेमी पुढे सरसावले आहेत. कुस्ती ही माझ्यासाठी केवळ खेळ नाही, तर जीवनशैली आहे. माझे लक्ष्य आता आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करणे आहे, असे भावनिक उद्गार लावण्याने व्यक्त केले.
खोपोलीची ही ‘कुस्तीची लावणी’ आता राष्ट्रीय पातळीवर झळकत आहे आणि तिच्या जिद्दीने रायगड जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे.


Post a Comment
0 Comments