* उद्धव ठाकरे यांचा राज्य सरकारवर घणाघात
* मराठवाडा दौऱ्यात संवाद साधताना ठाकरेंची टीका
* कर्जमाफी आणि नुकसानभरपाईशिवाय मत नाही
* शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी करण्याची मागणी
* अतिवृष्टीग्रस्तांना मदत द्या - उद्धव ठाकरेंची मागणी
परभणी / प्रतिनिधी :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मराठवाडा दौऱ्यात पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र सरकारवर घणाघात केला आहे. परभणीत शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी सरकारकडून कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ द्यावी अशी मागणी केली. ते म्हणाले की, मोदीजींनी नोटबंदी केली होती, आता जनतेने महायुतीसाठी वोटबंदी करावी.
* सरकार फक्त मत चोरण्यात व्यस्त :- उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही सगळे शेतकरी आहात ना ? मी शहरी आहे, पण शेतीचे दुःख समजतो. जमीन खरडून गेली आहे, माती वाहून गेली आहे, पण सरकार कुठे आहे ? कुणी मदत करायला येत नाही. हे सरकार मत चोरीशिवाय काहीच करीत नाही. पंचनामे फक्त कागदावर चालू आहेत.
* अतिवृष्टी आणि केंद्रीय पथकावर टीका :- ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत विचारले की, केंद्रीय पथक आले का तुमच्या दारात ? परदेशी समिती आली का ? मग जुलैपासून हे सगळे झोपलेत का ? आता निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे मोदीजी कोणते तरी ‘पॅकेज’ जाहीर करतील, पण त्याचा फायदा कोणालाच होणार नाही. त्यांनी उपहासाने म्हटले की, हे पॅकेज म्हणजे तुमच्या हाताला पाने पुसण्यासाठी असते.
* बिहारवरचे प्रेम, महाराष्ट्राकडे दुर्लक्ष :- उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा उल्लेख करीत पंतप्रधान मोदींवर टीका केली. फडणवीस म्हणाले होते की, मोदीजींना बिहारवर सर्वाधिक प्रेम आहे. मग महाराष्ट्राचे काय ? बिहारच्या महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा केले, तर देशभरातील सर्व महिलांना तेवढे पैसे का नाही देता ? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.
* शक्तिपीठ महामार्गाऐवजी उद्योगपतींसाठी नियम बदलले :- ठाकरे पुढे म्हणाले की, सरकार विकासाच्या नावाखाली फक्त उद्योगपतींची सेवा करते. अदानीच्या सिमेंट कंपनीसाठी नियम बदलून कल्याण-डोंबिवलीत जागा दिली. पण शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांकडे कोणी लक्ष देत नाही. जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा दाबणार नाही, तोपर्यंत हे काही ऐकणार नाहीत.
त्यांनी तिखट शब्दात सांगितले की, गहू-तांदूळ सडका मिळतो, तोच शिजवून त्यांनाच खाऊ घाला आणि म्हणा - आमचे काम करा, मग सोडतो.
* महायुतीला वोटबंदी करा :- उद्धव ठाकरे यांचा संतापजनक संदेश स्पष्ट होता की, मोदीजींनी नोटबंदी केली होती, तशी आता तुम्हाला वोटबंदी करावी लागेल. जोपर्यंत नुकसानभरपाई आणि कर्जमुक्ती मिळत नाही, तोपर्यंत महायुतीला मत देऊ नका. हेच तुमचे उत्तर असले पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते, पण काहीच झाले नाही. कर्जमुक्तीशिवाय मतदान नाही, असे ठामपणे म्हणा. तेव्हाच हे गुडघ्यावर येतील.
* आत्महत्या करू नका, आम्ही सोबत आहोत :- शेतकऱ्यांशी भावनिक संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाहीत, घरदार उद्ध्वस्त होते. काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. लढा, आम्ही तुमच्यासोबत आहोत.
उद्धव ठाकरे यांचा परभणी दौरा हा केवळ राजकीय प्रचार नव्हता, तर शेतकऱ्यांच्या वेदनांना आवाज देणारा संदेश होता. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, कर्जमाफी न झाल्यास मत नाही, वोटबंदी हाच शेतकऱ्यांचा उत्तर असेल.


Post a Comment
0 Comments