* अनाथपणातून डॉंक्टर होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास!
नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- जीवनातल्या सर्वच कठीण प्रसंगांवर मात करीत आपल्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन करणाऱ्या देवयानी देवरे हिने आज संपूर्ण गावाचा अभिमान वाढविला आहे. रवींद्र सुपडू पाटील यांच्या साडूची मुलगी असलेली देवयानी देवरे हिची नुकतीच भाऊसाहेब हिरे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, धुळे येथे एमबीबीएस (MBBS) अभ्यासक्रमासाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र आनंद आणि अभिमानाचे वातावरण आहे.
* संघर्षातून यशाकडे वाटचाल :- देवयानीचे बालपण अतिशय खडतर होते. केवळ सहा महिन्यांची असताना तिच्या आई-वडिलांचे सावट हरवले. पण या दु:खाने ती खचली नाही. उलट, परिस्थितीसमोर न झुकता तिने आयुष्याला एक वेगळी दिशा दिली. उंबरखेडे या गावात आजी-आजोबांच्या मायेच्या छायेखाली ती वाढली आणि तेथेच दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. पुढे सरदार एस. के. पवार ज्युनिअर कॉलेज, नगरदेवळा येथे 11 वी - 12 वी करीत असताना नीट (NEET) आणि सिईटी (CET) परीक्षेची तयारी अखंडपणे सुरू ठेवली.
* अथक मेहनतीचा विजय :- देवयानीच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा आणि दृढ निश्चयाचा परिपाक म्हणजे आजचे हे यश. तिच्या या कामगिरीने केवळ तिचे नाही, तर तिच्या स्वर्गवासी आई-वडिलांचं स्वप्न साकार झाले आहे. ते आज असते तर नक्कीच त्यांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू आणि चेहऱ्यावर समाधानाचे हास्य असते, असे गावकरी भावुकतेने म्हणतात.
* गावकऱ्यांचा अभिमान :- देवयानीचे हे यश संपूर्ण उंबरखेडे गावासाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या या यशाबद्दल रवींद्र सुपडू पाटील आणि देवरे परिवारासह सर्व ग्रामस्थांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. गावकऱ्यांच्या मते, ‘Dr. देवयानी देवरे’ म्हणून नाव घेताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमानाची झळाळी दिसेल.
* पुढील वाटचालीस शुभेच्छा :- देवयानी आता डॉंक्टर बनून समाजसेवेच्या मार्गांवर पुढे जाणार आहे. तिच्या या नव्या प्रवासासाठी संपूर्ण गावकऱ्यांकडून आणि नातेवाईकांकडून मनःपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ईश्वर तिच्या पुढील आयुष्यात यश, आनंद आणि समाजसेवेची निष्ठा कायम ठेवो हीच सर्वांकडून प्रार्थना करण्यात येत आहे.


Post a Comment
0 Comments