Type Here to Get Search Results !

भाजपाला रोखण्यासाठी वसईत मविआ - बविआ एकत्र यावे!

* काँग्रेस नेते विजय पाटील यांचे आग्रही प्रतिपादन

* संयुक्त बैठकीत धर्मनिरपेक्ष विचारसरणीच्या आघाडीचा निर्धार

वसई / नरेंद्र पाटील :- वसई-विरार आणि पालघर जिल्ह्यात भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी (मविआ) आणि बहुजन विकास आघाडी (बविआ) यांना एकत्र येणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय पाटील यांनी केले.


जातीयवादी आणि धर्माध विचारांच्या भाजपामुळे संविधान, लोकशाही आणि सर्वधर्मसमभाव धोक्यात आला असल्याचे सांगत पाटील म्हणाले, मविआ आणि बविआ मतभेद बाजूला ठेवून समान कार्यक्रम आखून निवडणुकीला एकत्र सामोरे आले, तर भाजपाला रोखणे शक्य आहे.


ही बैठक वसई (पूर्व) येथील गिरनार धाम, चिंचोटी येथे उत्साहात पार पडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सभेला मविआ आणि बविआ या दोन्ही आघाड्यांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

पाटील यांनी आपल्या भाषणात लोकनेते माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विकासाभिमुख राजकारणाचे कौतुक करीत समाजाला त्यांच्या भूमिकांची गरज आहे, असेही मत व्यक्त केले.


बविआ नेते आणि माजी खासदार बळीराम जाधव यांनी सांगितले की, विकसित भारतासाठी राहुल गांधी पंतप्रधान आणि विकसित महाराष्ट्रासाठी उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणे आवश्यक आहे. हेच आपले ध्येय असावे आणि यासाठी समविचारी मंडळींनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकत्र येणे गरजेचे आहे.


माजी आमदार राजेश पाटील म्हणाले की, मविआ आणि बविआ या दोन्ही आघाड्यांची विचारधारा धर्मनिरपेक्ष आणि परस्परपूरक आहे. त्यामुळे या दोन घटकांनी एकत्र येणे हे स्वाभाविक आणि लोकशाही बळकट करण्यासाठी आवश्यक आहे.


त्यांनी पुढे सांगितले की, संविधान, समाज आणि धर्मनिरपेक्षतेच्या रक्षणासाठी मविआ व बविआ सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले आहेत.


शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जनार्दन म्हात्रे म्हणाले की, मविआ आणि बविआ जर एकदिलाने लढले तर आपल्याला विजयापासून कोणीही रोखू शकणार नाही.


काँग्रेस पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी सांगितले की, पालघर जिल्ह्यातील नगर परिषदा व नगर पंचायतींमध्ये मविआ आणि बविआ एकत्र आल्यास भाजपासारख्या जातीयवादी शक्तींना निश्चितच पराभव पत्करावा लागेल.


त्यांनी स्पष्ट केले की, धर्मनिरपेक्षता आणि विकास या समान मूल्यांवर उभ्या असलेल्या दोन्ही आघाड्यांनी शहरी क्षेत्रातही ठोस एकजूट निर्माण केली पाहिजे.


वसई तालुका ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष राम पाटील यांनी या आघाडीच्या तयारीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांचा मविआतील सर्व घटक पक्षांतील तसेच बविआ नेत्यांशी सशक्त संवाद असल्यामुळे एकत्रित आघाडीच्या यशस्वी घडणीत ते मौलिक दुवा ठरत आहेत. सभेचे प्रास्ताविक करताना त्यांनी मविआ - बविआ आघाडी पूरक ठरणाऱ्या मुद्यांचा सविस्तर उहापोह केला, तर माजी सभापती भोईर यांनी आभार मानले.


सभेला ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजेंद्र गोपाळ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य कृष्णा माळी, वसई पंचायत समितीचे माजी सभापती अशोक पाटील, माजी नगरसेवक सुनिल आचोळकर, शिवसेनेचे रमेश जाधव, वसई पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रदीप पाटील, माजी उपसभापती जयप्रकाश ठाकूर, अर्नाळा येथील माजी सरपंच भोईर, पोमण ग्रामपंचायतीचे सरपंच कमलाकर जाधव, काँग्रेसचे मनिष पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस रोहित ससाणे (जुचंद्र), काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस अश्रफ अली तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीतील अनेक आजी - माजी सदस्य, सरपंच आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वसईत पार पडलेली ही मविआ - बविआ संयुक्त बैठक ही केवळ राजकीय नव्हे, तर धर्मनिरपेक्ष व संविधाननिष्ठ शक्तींच्या एकजुटीचे प्रतिक ठरली. भाजपाच्या वर्चस्वाला रोखण्यासाठी आणि विकासाभिमुख, सर्वसमावेशक राजकारणासाठी या दोन्ही आघाड्यांचे एकत्र येणे हे पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील राजकीय समीकरण बदलणारे पाऊल ठरू शकते, असे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे.


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement