* निवडणूक तयारीला नवी गती - कार्यकर्त्यांत उत्साह आणि आत्मविश्वासाची नवीन लहर
खोपोली / दिनकर भुजबळ :- खोपोली नगर परिषद निवडणूक 2025 जवळ येत असतांना शेतकरी कामगार पक्षाने संघटनबांधणी, प्रभागनिहाय जनसंपर्क आणि निवडणूक रणनीतीला आक्रमक वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे सरचिटणीस आणि आमदार भाई जयंत पाटील यांनी खोपोलीला भेट देत संपूर्ण निवडणूक यंत्रणेचा सखोल आढावा घेतला. या दौऱ्याने कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले असून, निवडणुकीची गती आता निर्णायक टप्प्याकडे वळल्याचे चित्र दिसत आहे.
* उमेदवारांशी थेट चर्चा :- भाई पाटील यांनी परिवर्तन विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉं. सुनील पाटील यांच्यासह प्रमुख उमेदवारांचा स्वतंत्रपणे संवाद घेऊन त्यांच्या प्रचाराच्या गतीचा, नागरिकांच्या प्रतिसादाचा आणि प्रभागनिहाय मुद्द्यांचा तपशीलवार आढावा घेतला.
बैठकीत अरुण पुरी, विनिता कांबळे (औटी), निजामुद्दीन जळगावकर, रवी रोकडे, संतोष मालकर, शिल्पा मालकर, तस्लीमा नासिर पाटील, गणेश सूतक आदी उमेदवार होते. प्रभागनिहाय समस्यांची मांडणी, नागरिकांच्या अपेक्षा, प्रचारातील त्रुटी आणि संधींचे वास्तविक विश्लेषण यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
* खोपोलीच्या विकासासाठी ठोस भूमिका :- भाई पाटील यांनी शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि विस्ताराचा उल्लेख करीत खोपोलीसाठी पाणीपुरवठा व्यवस्थेचे सर्वंकष सुधारीकरण, सुरक्षित आणि अपघातमुक्त वाहतूक व्यवस्था, सांडपाणी आणि स्वच्छतेची मजबूत पायाभरणी, दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सुविधा, सर्वसामान्य व कामगार वर्गाला केंद्रस्थानी ठेवणारा विकास आराखडा हे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित केले. साध्या माणसाचा, कामगारांचा आणि सर्वसामान्यांचा आवाज राजकारणाच्या केंद्रस्थानी असायलाच हवा, हे शेकापचे धोरण आजही कायम आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
* प्रभागनिहाय आढावा :- दौर्यादरम्यान प्रत्येक प्रभागातील प्रमुख अडचणी त्वरित संकलित करून त्या निवडणूक जाहीरनाम्यात प्रतिबिंबित करण्याचे निर्देश त्यांनी उमेदवारांना दिले. प्रत्येक घराशी थेट संवाद, नागरिकांचा विश्वास पुनर्स्थापित करणे, प्रभागातील समस्यांचे तांत्रिक दस्तावेजीकरण, उपाययोजना जनतेसमोर स्पष्ट मांडणे, डिजिटल आणि मैदानी प्रचाराला संतुलित गती देणे यावर मुख्य भर देण्याचे त्यांनी सांगितले.
* कार्यकर्त्यांचा उत्साह :- या दौऱ्यास शेकापचे तालुका चिटणीस किशोर पाटील, खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम, ज्येष्ठ नेते बंधू पाटील आणि विविध प्रभागांतील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाई पाटील यांच्या स्वागतासाठी शहरातील अनेक भागांत उत्स्फूर्त प्रतिसाद दिसला. कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर असलेला उत्साह आणि उमेदवारांमध्ये दिसणारा आत्मविश्वास या निवडणुकीत शेकापची लढत अधिक सक्षम होणार असल्याचे दिसून आले.
* राजकीय समीकरणांना नवा वेग :- या भेटीनंतर खोपोलीतील राजकीय वातावरण अधिक तापले असून, शेतकरी कामगार पक्षाने या निवडणुकीत ताकदवान भूमिका घेण्यासाठी सज्ज असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाई पाटील यांच्या रणनीतिक मार्गदर्शनामुळे आगामी निवडणुकीत पक्ष अधिक प्रभावीपणे उभा राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Social Plugin