* आधुनिक विद्यार्थ्यांना घडविणे शिक्षकांसाठी आव्हानात्मक ; भारतीय जीवनमूल्यांशी जोडण्याचे आवाहन
रायगड / प्रतिनिधी :- आजची मुले स्मार्ट आणि माहितीसमृद्ध आहेत. त्यामुळे शिक्षकांनीही त्याहून अधिक स्मार्ट, समजून घेणारे आणि मार्गदर्शक बनले पाहिजे. मुलांना रागावणे किंवा अपमानित करण्याचे युग संपले आहे. शाळांनी विद्यार्थी केवळ शिकवू नयेत, तर त्यांना शिक्षित, दीक्षित आणि आदर्श नागरिक बनवावे, असे उद्गार महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केले.
उलवे येथील भूमिपुत्र सभागृहात डीएव्ही महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने राज्यपालपद स्विकारल्याबद्दल त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते मार्गदर्शन करीत होते.
* माहिती मिळते, पण जीवनाचे उद्दिष्ट शिकवले जात नाही :- राज्यपाल म्हणाले की, वर्तमान शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांना भरपूर माहिती देत असली, तरी जीवनाचे ध्येय, आदर्श मूल्ये आणि नैतिकता शिकविण्यात कमतरता आहे. त्यामुळे “अपूर्ण व्यक्तिमत्त्व” शाळांतून बाहेर पडत आहेत, ही शिक्षणव्यवस्थेसमोरील मोठी समस्या असल्याचे त्यांनी नमूद केले.
* शिक्षकांचे आचरणच विद्यार्थ्यांचे पहिले पाठ्यपुस्तक :- लहान मुले शिक्षकांचे प्रत्येक वर्तन टिपत असतात. त्यामुळे शिक्षकांचे आचरणच विद्यार्थ्यांसाठी पहिले पाठ्यपुस्तक असते, असे सांगत राज्यपालांनी शिक्षकांना आदर्श ठरण्याचे आवाहन केले. त्यांनी पुढे म्हटले की, मुलांना भारतीय जीवनमूल्यांशी जोडणे त्यांच्यात ध्येयदर्शन, संस्कार आणि शिस्त रुजवणे, आधुनिक ज्ञानासोबत नैतिकतेचा पाया मजबूत करणे ही शिक्षणसंस्थांची प्राथमिक जबाबदारी आहे.
* 7 मुलांपासून हजारो विद्यार्थ्यांपर्यंतचा प्रवास :- राज्यपाल देवव्रत हे डीएव्ही संस्थेचे माजी विद्यार्थी असून ते हरियाणातील कुरुक्षेत्र येथे गुरुकुल चालवतात. त्यांनी सांगितले की, मी गुरुकुलाची सुरुवात फक्त सात विद्यार्थ्यांपासून केली. आज हजारो विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत आणि देशभरातून लोक गुरुकुलाचे काम प्रत्यक्ष पाहण्यासाठी येतात.
* डीएव्ही संस्थेच्या योगदानाचे कौतुक :- आपल्या सत्काराबद्दल बोलताना राज्यपाल म्हणाले की, हा माझ्या स्वतःच्या कुटुंबाकडून मिळालेला सन्मान आहे. माझ्या जडणघडणीत महर्षी दयानंद, आर्य समाज आणि डीएव्ही संस्थेचे अत्यंत मोलाचे योगदान आहे. शैक्षणिक क्षेत्रात डीएव्ही संस्थेने दिलेले व्यापक योगदान हे अद्वितीय असल्याचे त्यांनी गौरवले.
या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून डीएव्ही कॉलेज व्यवस्थापन समिती अध्यक्ष पूनम सूरी, मानद सचिव अजय सुरी, उपाध्यक्ष एस. के. सोपोरी, प्रबोध महाजन, अनिल कुमार राव, संचालिका डॉं. निशा पेशीन, राज्यपालांचे सचिव डॉं. प्रशांत नारनवरे विविध डीएव्ही शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
राज्यपाल देवव्रत यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी उपस्थित असलेल्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिक्षणात मूल्याधिष्ठितता, आधुनिकतेची सांगड आणि योग्य नागरिकत्व घडविण्याचा संदेश हा या कार्यक्रमाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला.


Social Plugin