* आमची मुले निर्दोष आहेत : आरोपींच्या पालकांचे भावनिक आवाहन
नगरदेवळा / प्रतिनिधी :- नगरदेवळा (ता. पाचोरा) येथील रथोत्सव यात्रेच्या शेवटच्या दिवशी झालेल्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात लक्ष्मण पाटील, उदय मांडोळे, निलेश मांडोळे आणि ईश्वर महाजन या चार तरुणांविरुद्ध पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोपी तरुणांचे आईवडील यांनी आपल्या मनातील व्यथा मांडली. आमच्या मुलांनी जर खरोखर चूक केली असेल, तर त्यांना शिक्षा मिळावी, पण निरपराधांवर अन्याय होऊ नये. न्याय देवता आमच्या प्रार्थनेला उत्तर देईल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.
आमची मुले तरुण आहेत, त्यांचे रक्त सळसळते आहे, वयाच्या जोशात ते भांडण करतील, पण कोणत्याही मुलीला किंवा महिलेला छेडणार नाहीत, याची आम्हाला पूर्ण खात्री आहे, असे मत लक्ष्मण पाटील याचे वडील साहेबराव शामराव पाटील व आई संगीताबाई पाटील तसेच उदय मांडोळे याचे वडील ईश्वर गोपीचंद मांडोळे व आई सुनंदाबाई मांडोळे यांनी ‘दै. कोकण प्रदेश न्यूज’शी बोलतांना व्यक्त केले.
पालकांनी पुढे सांगितले की, आम्ही न्यायालयाचा पूर्ण सन्मान करतो. आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर आणि न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे. आज नाही तर उद्या सत्य नक्कीच बाहेर येईल. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं...आम्ही आमच्या मुलांसाठी न्यायालयीन लढाई लढू. आवश्यक असल्यास उच्च व सर्वोच्च न्यायालयातही जावू. आमच्या मुलांच्या कपाळावर जो डाग लागला आहे, तो आम्ही पुसल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
आईवडीलांनी पुढे भावनिक स्वरात म्हटले की, देव सर्व पाहतो. आम्ही देवाला प्रार्थना केली आहे की, तो आमच्या निरपराध मुलांना न्याय देवो. देव आणि न्याय देवता दोघांवर आमचा पूर्ण विश्वास आहे.
या घटनेने नगरदेवळा व परिसरात चर्चांना उधाण आले असून, न्यायालयीन चौकशी पारदर्शकपणे पार पडावी आणि सत्य बाहेर यावे, अशी सर्वच स्तरातून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Post a Comment
0 Comments