Type Here to Get Search Results !

गूगलची मोठी चेतावणी : असा मेसेज आल्यास तात्काळ डिलीट करा - नाहीतर हॅकर्स रिकामे करतील तुमचे बँक खाते!

* चीनमधील सायबर गँग पाठवत आहेत बनावट मेसेज

* मोबाईल वापरकर्त्यांनी सतर्क रहावे - क्लिक केल्यास डेटा चोरी आणि आर्थिक फसवणुकीचा मोठा धोका!

मुंबई / प्रतिनिधी :- स्मार्टफोनने आपले जीवन नक्कीच सुलभ केले आहे, मात्र त्याचबरोबर सायबर हल्ल्यांचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे. जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी कंपनी Google ने एक गंभीर इशारा दिला आहे. चीनमधील हॅकर्स लाखो मोबाईल वापरकर्त्यांना स्पॅम मेसेज पाठवत आहेत आणि त्याद्वारे लोकांचे बँक खाते साफ केले जात आहे.

गुगलच्या म्हणण्यानुसार, हे मेसेज iPhone आणि Android दोन्ही प्रकारच्या फोनवर पाठवले जात आहेत आणि अमेरिका, युरोपसह इतर देशांमध्ये दररोज लाखो लोकांना टार्गेट केले जात आहे.


* हे मेसेज दिसायला साधे, पण आहेत फसवे :- सायबर सुरक्षा अहवालानुसार, हे फसवे मेसेज अतिशय विश्वासार्ह स्वरूपात येतात. उदाहरणार्थ - तुमचा टोल शुल्क बाकी आहे, तात्काळ भरा. तुमचे पार्सल तुमच्या पत्त्यावर पोहोचू शकले नाही. तुम्हाला रिफंड मिळणार आहे, येथे क्लिक करा.


या प्रत्येक मेसेजसोबत एक लिंक (URL) असते. जर ती लिंक उघडली, तर तुमचा मोबाईल डेटा, बँक माहिती आणि पासवर्ड हॅकर्सच्या हाती पोहोचतो. हे मेसेज चीनमधील सायबर गुन्हेगारी टोळ्या (Cyber Gangs) तयार करतात आणि ते परदेशी सिम कार्डद्वारे पाठवले जातात जेणेकरून मोबाईल नेटवर्कवरील फिल्टर त्यांना थांबवू शकत नाहीत.


* Android अधिक सुरक्षित, पण धोका तरीही कायम :- गुगलने सांगितले आहे की, Android प्रणाली दर महिन्याला 1 अब्जांहून अधिक स्पॅम कॉल आणि मेसेज ब्लॉक करते, तसेच Gmail मध्ये 99.9% स्पॅम ईमेल थांबवले जातात. तरी देखील काही मेसेज फिल्टरच्या पलीकडे जातात.


Apple नेही iOS 26 मध्ये Call Screening आणि Message Filtering जोडले आहे, ज्यामुळे संशयास्पद लिंक आणि रिप्लाय ब्लॉक होतात. तरी सुद्धा दररोज अब्जावधी रुपयांची सायबर फसवणूक होत असल्याचे गुगलने नमूद केले आहे.


गुगलच्या ब्लॉगनुसार Android सध्या iPhone पेक्षा अधिक सुरक्षित आहे, मात्र Pixel सारख्या मॉडेल्समध्ये सर्वाधिक सुरक्षा उपलब्ध आहे.


* स्पॅम मेसेज आल्यास काय करावे ? :- गुगल आणि अमेरिकेच्या FBI (Federal Bureau of Investigation) यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत :

1. संशयास्पद मेसेज ताबडतोब डिलीट करा.

2. अशा मेसेजला Smishing म्हणतात - म्हणजे SMS Phishing.

3. मेसेजमधील कोणतीही लिंक उघडू नका.

4. फोनच्या सेटिंगमध्ये Spam Filter किंवा Fraud Detection ऑन ठेवा.

5. मोबाईल आणि अ‍ॅप्स अपडेटेड ठेवा.

6. जर चुकून क्लिक झालेच, तर तात्काळ बँक खाते तपासा, पासवर्ड बदला आणि पोलिसांना कळवा.


* सावधगिरीच सर्वोत्तम सुरक्षा :- गुगलने स्पष्ट केले आहे की, स्पॅम आणि स्मिशिंगपासून वाचण्यासाठी एकच मार्ग - सावधगिरी आणि सतर्कता! तंत्रज्ञानाच्या या युगात प्रत्येक क्लिक धोकादायक ठरू शकते. म्हणूनच, कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करण्याआधी दहा वेळा विचार करा - कारण एक चुकीचा क्लिक तुमचे बँक खाते रिकामे करू शकतो.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement