Type Here to Get Search Results !

समुदायाभिमुख उपक्रमातून नगरदेवळा येथे इज्तेमाई विवाह सोहळा यशस्वी

* अल खिदमत फाउंडेशनच्या पुढाकारातून 5 जोडप्यांचे हदीस व सुन्नतनुसार निकाह ; सामूहिक विवाह उपक्रमाचे समाजातून कौतुक

नगरदेवळा / फिरोज पिंजारी :- पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथे अल-खिदमत फाउंडेशनतर्फे भव्य इज्तेमाई (सामूहिक) विवाह सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. 2 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात 5 जोडप्यांचा हदीस व सुन्नतप्रणीत पद्धतीने साध्या-सरळ रीतीने निकाह संपन्न झाला. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल बांधवांना मदत करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याप्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की, सामूहिक विवाह सोहळ्यांतून जनमानसात सामाजिक एकात्मतेचा संदेश रुजविला जातो. त्यामुळे हे विवाह सोहळे ही समाजाची गरज बनली आहे.



या सामाजिक उपक्रमाचे नियोजन व आयोजन नगरदेवळा येथील तरुणांनी फरीद खान, अबरार खान, सुफियान शेख, दानिश सैय्यद आणि अनिस बागवान यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या अल खिदमत फाउंडेशन तर्फे करण्यात आले. समाजातील गरीब आणि गरजू बांधवांच्या मुलामुलींना कमी खर्चात, इस्लामी पद्धतीनुसार विवाह करता यावेत, या हेतूने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता.


कार्यक्रमाला पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील तसेच शिवसेना जिल्हाध्यक्ष मनोहर गिरधर पाटील (रावसाहेब जिभू), प्राचार्य किरण काटकर, हिंदुस्तान गॅस एजेंसी संचालक (पाचोरा) हाजी अबुलेस हाजी अलाउद्दीन शेख, अल-हाज जाकिर अ. लतीफ (मालेगाव), सैय्यद अयाज अली नीयाज अली (जळगांव), जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी या उपक्रमाचे मनापासून अभिनंदन करीत अशा सामूहिक विवाह उपक्रमांनी समाजात एकता वाढते व तरुणांमधील सामाजिक बांधिलकी दृढ होते, असे गौरवोद्गार काढले.


वधू-वरांना विवाहासाठी लागणारे साहित्य देण्यात आले असून, निकाह प्रक्रिया सुन्नतपद्धतीने व अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. साधेपणा, इस्लामी मूल्यांचा आदर्श आणि समाजएकतेचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला. अल-खिदमत फाउंडेशनच्या या प्रयत्नामुळे ग्रामीण भागात सामूहिक विवाहाची संकल्पना बळकट होत असून, समाजात सकारात्मक बदल घडविण्याची दिशा तरुणांकडून मिळत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement