* तात्काळ खड्डे भरावेत ; अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण - पत्रकार अशोक परदेशी यांचा इशारा
भडगाव / प्रतिनिधी :- भडगाव ते वाडे मार्गांवरील दुरुस्तीच्या कामाची मागणी करीत पत्रकार अशोक बापू परदेशी यांनी भडगाव सार्वजनिक बांधकाम विभागाला लिखित निवेदन दिले आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले असून, तात्काळ काम न झाल्यास भडगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भडगाव ते वाडे या रस्त्यावर ठिकठिकाणी छोट्या मोठ्या खड्डयांचे मोठ्या प्रमाणात जाळे पसरलेले आहे.
* रस्त्यावरील खड्ड्यांचे जाळे :- निवेदनात नमूद केल्याप्रमाणे भडगाव - कोठली, कोठली - कनाशी, गोंडगाव - वाडे या मार्गांवर सर्वत्र पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे वाहन चालविणे अत्यंत कठीण झाले असून वाहने पंक्चर होणे, लहान अपघात, प्रवाशांना त्रास अशा अनेक अडचणी सातत्याने दिसून येत आहेत.
* कृती नसेल, तर उपोषण - परदेशी यांचा इशारा :- पत्रकार अशोक परदेशी यांनी सांगितले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. जनतेचा संयम सुटत आहे. रस्त्याची तातडीने डागडुजी करावी, अन्यथा ग्रामस्थांसह तहसील कार्यालयासमोर उपोषण केले जाईल.
* मागण्या :- खड्डे तात्काळ भरावेत, रस्ता सुरक्षित व सोयीस्कर करावा, विलंब केल्यास आंदोलन - उपोषणाची तयारी.
या निवेदनावर पत्रकार अशोक परदेशी यांची स्वाक्षरी असून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.


Social Plugin