Type Here to Get Search Results !

अलका भुजबळ यांना “रापा” पुरस्काराने सन्मानित

* उत्कृष्ट पोर्टल निर्मात्या म्हणून गौरव - दूरदर्शन निवेदिका अमृता राव यांच्या हस्ते पुरस्कार ; पत्रकारितेतून समाजजागृतीचे कार्य केल्याबद्दल मिळाला मानाचा सन्मान

मुंबई / प्रतिनिधी :- पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकी या दोन क्षेत्रांचा सुंदर संगम साधणाऱ्या “न्यूज स्टोरी टुडे” पोर्टलच्या निर्मात्या अलका भुजबळ यांना नुकताच “रापा पुरस्कार” (Radio and TV Producers Association Award) प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना “उत्कृष्ट पोर्टल निर्मात्या” म्हणून देण्यात आला असून पुरस्कार वितरण समारंभात उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले.


हा सन्मान दूरदर्शन निवेदिका आणि चित्रपट निर्मात्या अमृता राव यांच्या हस्ते अलका भुजबळ यांना प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक किरण शांताराम आणि चित्रपट तंत्रतज्ञ उज्ज्वल निरगुडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


* न्यूज स्टोरी टुडे : संकटात उभे राहिलेले प्रेरणादायी व्यासपीठ :- पुरस्कार स्विकारल्यानंतर बोलतांना अलका भुजबळ म्हणाल्या की, पाच वर्षांपूर्वी कोरोनाच्या संकटात लोकांना घाबरवून न सोडता त्यांना धीर आणि दिलासा देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले. माझी मुलगी आणि पत्रकार देवश्री भुजबळ हिने या पोर्टलची निर्मिती केली. आजही हे पोर्टल त्या सामाजिक उद्देशाशी प्रामाणिक राहून कार्य करीत आहे.


त्या पुढे म्हणाल्या की, कला, साहित्य, संस्कृती, आरोग्य, विज्ञान, पर्यटन, यशोगाथा आणि सामाजिक बंधुत्व या सर्व विषयांवर माहिती, लेख आणि व्हिडिओंच्या माध्यमातून आम्ही समाजजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहोत.


* व्यासपीठावर पतीसह पुरस्काराचा मान :- अलका भुजबळ यांनी पुरस्कार स्विकारतांना आपल्या पती आणि पोर्टलचे संपादक देवेंद्र भुजबळ यांना व्यासपीठावर बोलावून त्यांच्या हातात पुरस्कार ठेवत “हा पुरस्कार आमचा संयुक्त प्रयत्न आहे” असे सांगत दोघांनी एकत्र सन्मान स्विकारला.


या कार्यक्रमात रेडिओ आणि टीव्ही माध्यमातील उल्लेखनीय कार्यासाठी सरिता सेठी आणि ब्रिज मोहन यांना “जीवन गौरव पुरस्कार” देण्यात आला. तसेच विविध कलाकार, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.


* “रापा”च्या सुवर्ण कारकिर्दीचा आढावा :- कार्यक्रमाच्या प्रारंभी रापाचे प्रमुख रत्नाकर तारदाळकर यांनी संस्थेच्या 50 वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा सादर केला. रेडिओ आणि टीव्ही माध्यमातील उत्कृष्ट कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी “रापा”ने गेल्या अनेक दशकांपासून उल्लेखनीय योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले.


* मनोरंजन आणि सन्मानाचा सुंदर संगम :- पुरस्कार सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, गीत-संगीत व नृत्याविष्कार सादर करण्यात आले, ज्यांनी उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमास रेडिओ, दूरदर्शन आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर, कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते.


अलका भुजबळ यांच्या या यशामुळे केवळ त्यांचा नाही तर संपूर्ण डिजिटल पत्रकारिता क्षेत्राचाही सन्मान झाला आहे. समाजाभिमुख वृत्तपत्रकारितेचा एक नवा मापदंड त्यांनी निर्माण केला आहे.

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement