* आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी शिवसेना ठरली योग्य व्यासपीठ - निरगुडा यांचा विश्वास
कर्जत / फिरोज पिंजारी :- कर्जत तालुका आदिवासी सेलचे माजी तालुका अध्यक्ष आणि पोशीर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हरिश्चंद्र निरगुडा यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत (शिंदे गट) जाहीर प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. 3 नोव्हेंबर 2025 रोजी कर्जत येथील बाळासाहेब भवन जनसंपर्क कार्यालयात आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश झाला.
* स्थानिकांना न्याय मिळवण्यासाठी शिवसेनेत आलो - निरगुडा :- पक्ष प्रवेशानंतर बोलतांना हरिश्चंद्र निरगुडा म्हणाले की, कळंब जिल्हा परिषद वॉंर्डात आदिवासी आरक्षण असतानाही बाहेरील उमेदवारांवर पक्षाने भर दिल्याने स्थानिकांना न्याय मिळाला नाही. आमच्या समाजाचा स्वाभिमान जपण्यासाठी आणि आदिवासी बांधवांचा आवाज बुलंद करण्यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. शिंदे साहेब आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असून पक्षासाठी निष्ठेने काम करू.
* आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून निरगुडांचे स्वागत :- याप्रसंगी आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, राज्यात शिवसेनेची ताकद सातत्याने वाढत आहे. शिवसेना जनतेच्या मनात आहे. आदिवासी समाजाची बाजू मजबूतपणे मांडणारे हरिश्चंद्र निरगुडा यांचा प्रवेश हा कळंब विभागात शिवसेनेला बळ देणारा आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होईल. तसेच त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थतीवर भाष्य करीत, स्थानिकांना अन्याय झाल्यास शिवसेना त्यांच्या पाठीशी उभा राहील, असे सांगितले.
* निरगुडांना जिल्हा परिषद उमेदवारीचा इशारा :- कार्यक्रमादरम्यान निरगुडांच्या कार्याची प्रशंसा करीत त्यांना कळंब जिल्हा परिषद वॉंर्डातून उमेदवारी जाहीर करण्यात आली. आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी शिवसेना ठामपणे लढेल, अशी ग्वाहीही यावेळी देण्यात आली.
या सोहळ्यास जिल्हाप्रमुख संतोष भोईर, उपजिल्हा प्रमुख भाई गायकर, तालुका प्रमुख सुदाम पवाली, विधानसभा संघटक शिवराम बदे, युवासेना जिल्हा प्रमुख प्रसाद शेठ थोरवे, माजी उपसभापती मनोहर थोरवे, तालुका संघटक सुनिल रसाळ, माजी सभापती राहुल विशे, खजिनदार उत्तम शेळके, उपतालुका प्रमुख भरत डोंगरे, उपतालुका संपर्क प्रमुख प्रशांत झांजे, युवासेना सचिव नितीन झांजे, विभाग प्रमुख भरत हाबळे, विभाग प्रमुख भानुदास राणे, विभाग संघटक रवी फोफे, युवासेना प्रवक्ता अमोल देशमुख, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष फारूक खान, युवासेना विभाग प्रमुख बबलू डायरे, कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांसह अनेक मान्यवर व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Social Plugin