* हितेंद्र ठाकूरांचे विरोधकांना खुले आव्हान : वसई-विरार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बविआ मेळाव्यात राजकीय तापमान चढले
वसई / नरेंद्र एच. पाटील :- वसई-विरार महापालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बहुजन विकास आघाडीच्या (बविआ) चिंचोटी येथील भव्य मेळाव्यात बविआचे संस्थापक हितेंद्र ठाकूर यांनी विरोधकांना थेट आव्हान देत राजकीय खळबळ उडवून दिली.
हिंम्मत असेल तर एका स्टेजवर येऊन लोकांसमोर बोला. आम्ही केलेले काम जनता सांगेल. रस्ते आम्ही बांधले, पाणी-वीज आम्ही आणली. आजपर्यंत कुणी एक थेंब पाणी आणले नाही. तुमच्या कामावर चर्चा करायची असेल तर एका स्टेजवर या, असे आव्हान ठाकूर यांनी सभेतून विरोधकांना दिले.
ते पुढे म्हणाले की, 35 वर्षांत बविआने विकास केला. आमच्या खासदाराने डहाणूपर्यंत रेल्वे नेली, गॅस आणला. तुमच्या खासदारांनी काय केले ते दाखवा. खड्डे भरायलाही मुख्यमंत्री लागतात, हे किती मोठे दुर्दैव आहे. सभेत ठाकूरांनी विरोधकांना कठोर शब्दांत टोला हाणत जनतेसमोर जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
* स्थानिकांना प्राधान्य - सर्व समाजाला साथ :- यावेळी बोलताना ठाणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काशिनाथ पाटील म्हणाले की, उमेदवार स्थानिक असणार आहे. मराठी, गुजराती, उत्तर भारतीय, मुस्लिम सर्व समाजाला घेऊन एकदिलाने काम करू आणि आपला उमेदवार विजयी करू.
माजी आमदार राजेश पाटील यांनी भाषणात म्हटले की, 35 वर्षांपूर्वी वसई-विरारमध्ये रस्ते, सुविधा काहीच नव्हत्या. ते निर्माण करणारे बविआ आणि आप्पा आहेत. रस्ते खराब झाले तर ते दुरुस्त करणे महत्त्वाचे, पण आज खड्डे भरायलाही मुख्यमंत्री लागतात, हे पराभवाचे लक्षण आहे.
* नेते, कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती :- यावेळी माजी महापौर नारायण मानकर, माजी खासदार बळीराम जाधव आदी नेत्यांची भाषणे झाली. माजी महापौर रुपेश जाधव, ठाणे जिल्हा बँक चेअरमन राजेंद्र पाटील, परिवहन सदस्य कुंदन विरारकर, नगरसेवक सचिन देसाई, पंकज पाटील, किशोर धुमाळ, सुनील आचोळकर, जयंत म्हात्रे, कमलाकर जाधव, उपसरपंच हेमराज भोईर, वालीव अध्यक्ष जयप्रकाश पाटील, अरविंद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पावसातही सभागृह खचाखच भरले होते, यावरून कार्यकर्त्यांचा उत्साह दिसून आला.
* शेकडो कार्यकर्त्यांचा बविआत प्रवेश :- मेळाव्यात शिंदे सेनेचे शेकडो कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीत दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी हितेंद्र ठाकूर स्वतः उपस्थित होते. शासनात असूनही आमच्याकडेच कार्यकर्ते येत आहेत. हा विजयाचा पहिला टप्पा आहे, असे ठाकूर म्हणाले.
या मेळाव्यामुळे वसई-विरारच्या राजकारणात नवा उत्साह आणि तणाव निर्माण झाला असून आगामी निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे. ठाकूरांच्या आव्हानामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.


Social Plugin