Type Here to Get Search Results !

माजी महापौर रुपेश जाधव आक्रमक

* जलकुंभ कार्यान्वित न केल्यास बविआ स्वतः पाणीपुवठा सुरु करणार ; कोट्यवधींचा जलकुंभ धूळखात

वसई / नरेंद्र एच .पाटील :- प्रशासकीय राजवटीत वसई-विरार महानगरपालिकेने संवेदनशून्य आणि निर्ढावलेल्या कारभाराचा कळस गाठला गेला आहे. रस्ते, टेंडर घोटाळा, अनधिकृत बांधकामे आदी सर्वच स्तरावर प्रशासकीय राजवटीत भ्रष्ट्राचार बोकाळला असल्याचे दिसून येत आहे. आचोळे विभागात जनतेच्या पैशातून कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले तीन अजस्त्र जलकुंभ केवळ प्रशासनाच्या कुंभकर्णी झोपेमुळे वापराविना सडत पडले आहेत. एकीकडे लाखो नागरिक हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण भटकत असताना, दुसरीकडे हे पांढरे हत्ती ठरलेले जलकुंभ जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. या प्रशासकीय अनास्थेविरोधात प्रचंड संतापाची लाट उसळली असून, येत्या पंधरा दिवसांत हे जलकुंभ सुरू न झाल्यास  नागरिकांसह रस्त्यावर उतरण्याचा अंतिम इशारा माजी महापौर रुपेश जाधव यांनी दिला आहे. तसेच जलकुंभातून पाणी पुरवठा कार्यान्वित न केल्यास बविआ स्वतः पाणीपुवठा सुरु करणार असल्याचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. 


तत्कालीन महापौर रुपेश जाधव यांच्या दूरदृष्टीमुळे आणि अथक प्रयत्नांमुळे आचोळे विभागाची भविष्यातील पाण्याची गरज ओळखून प्रत्येकी 3 दशलक्ष लिटर क्षमतेच्या तीन भव्य जलकुंभांना (एकूण मिळून 90 लाख दक्षलक्ष लिटर) मंजुरी मिळाली. आचोळे स्मशानभूमी, राम रहीम नगर आणि एव्हरशाईन सिटीजवळ हे जलकुंभ बांधून पूर्णही झाले. मात्र, पालिकेतील निष्क्रिय आणि नियोजनशून्य अधिकाऱ्यांमुळे हे जलकुंभ आज केवळ शोभेची वस्तू बनून धूळ खात पडून आहेत. जनतेच्या पैशाचा असा चुराडा करण्यासाठीच हे जलकुंभ बांधले का ? असा संतप्त सवाल रुपेश जाधव यांनी उपस्थित केला आहे. सध्या शहरात पाणीपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू आहे. 


सूर्या जलवाहिनीला लागलेली गळती आणि वीजपुरवठ्यातील सततचा व्यत्यय यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या काळात तर संपूर्ण शहराची तहान भागवणे प्रशासनाला जमले नाही. अशा गंभीर परिस्थितीत हे 9 दशलक्ष लिटर पाणी साठवलेले तीन जलकुंभ लोकांसाठी संजीवनी ठरले असते. मात्र, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे गाला नगर, चंदन नाका, एव्हरशाईन सिटी आणि लिंक रोड परिसरातील हजारो कुटुंबांना टँकर लॉबीच्या दावणीला बांधले गेले आहे. महागडे पाणी विकत घेताना नागरिकांचे खिसे रिकामे होत असून, त्यांचा आक्रोश दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे.


एकीकडे लाखो नागरिकांचा पाण्याविना होणारा आक्रोश आणि दुसरीकडे माजी महापौरांनी आंदोलनासाठी फुंकलेले रणशिंग, या कात्रीत आता पालिका आयुक्त काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. लोकांच्या संयमाची परीक्षा पाहण्याऐवजी प्रशासनाने तातडीने जागे होऊन आपली जबाबदारी पार पाडावी, अन्यथा हा जनक्षोभ प्रशासनाला चांगलाच महागात पडेल, असा संतप्त सूर नागरिकांमधून उमटत आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Advertisement